लिंबागणेश(प्रतिनिधी): बीड तालुक्यातील बालाघाटावर आणि पाटोदा तालुक्यात पवन ऊर्जा प्रकल्प उभारणी कंपन्यांचा सुळसुळाट असुन शेतकऱ्यांची फसवणूक करत मनमानी कारभार सुरू असुन शासकीय पाणंद रस्त्यावर अतिक्रमण असो अथवा वाहनांसाठी रस्ता करताना संबंधित शेतकऱ्यांना विश्वासात न घेता उभ्या पिकातुन नुकसान करत वहिवाट असो याविषयी कोणालाही न विचारता अरेरावी सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे.लिंबागणेश येथील शेतकरी भैरूबा गुरुबा दाभाडे व नितिन दशरथ दाभाडे यांच्या शेतपिकांचे पवनचक्की उभारतानाचे क्रेन पडल्याने पिकांचे व झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे.
सोयाबीन पिकांचे तसेच झाडांचे नुकसान, भरपाई देण्यास टाळाटाळ:- भैरूबा दाभाडे
लिंबागणेश येथील शेतकरी भैरूबा दाभाडे व नितिन दाभाडे यांच्या शेताशेजारी पवनचक्की उभारत असताना मध्यरात्री क्रेन पडल्याने झाडांचे व सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत आहेत.मध्यरात्री क्रेन पडल्याने अनर्थ टळला नाहीतर एरवी दिवसा त्याच झाडाखाली माणसं आणि जनावरे बांधलेली असतात.मध्यरात्री क्रेन पडल्याने जिवित हानी झाली नाही. दुष्काळात तेरावा महिना म्हणल्याप्रमाणे गत झाली आहे.रात्रभर जागून पिकाला पाणी दिले परंतु क्रेन पडल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पवन प्रकल्प कंपन्यांची दादागिरी सुरू असुन जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे:- डॉ.गणेश ढवळे

बीड आणि पाटोदा तालुक्यातील पवन ऊर्जा प्रकल्प उभारणी करणार-या रेणु पावर कंपनी आणि सहयोगी वेदांश इन्फ्रा कंपनी यांनी स्थानिक दलालांच्या मदतीने शेतकऱ्यांची फसवणूक करुन जमिनी कवडीमोल भावाने लुबाडलेल्याच आहेत.परंतु त्याचबरोबर ग्रामीण भागातील शिवरस्ते, पाणंद रस्ते यावर सुद्धा अतिक्रमण केले आहे.पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही येथील शेतकरी जयवंत शिंदे यांना पवन ऊर्जा कंपन्यांनी अतिक्रमण केल्याने त्यांच्या शेतात जाण्याचा रस्ता बंद केला होता.रस्ता खुला करण्यात यावा यासाठी १५ आगस्ट स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषणानंतर रस्ता खुला करून देण्यात आला. अशिक्षित शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक या कंपन्या करत असुन जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.