आजी मायेचा सागर, आनंदाचे आगर….!

Picsart 23 01 17 14 56 13 907

लिहिण्याची सुरुवात कुठून करावी हेच आज मला कळत नाही, कारण काही नाती अशी असतात की त्याच्या मायेने, मातृत्वाने,कर्तुत्वाने,दातृत्वाने, आपुलकीने, निस्वार्थ भावनेने,प्रेमाने, निथळ मनाने, आपल्या जीवनातील एक न विसरणारा भाग बनून जातात. असाच आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला, त्याच्या मायेच्या ओलाव्याने,प्रेमाने, आपुलकीने, आपल्या कडील प्रत्येक व्यक्तीची विशेष काळजी घेणारी नकळत हळुच आमच्या सर्वांच्या आयुष्यातून न सांगता निघून गेलेली माझ्या आजोळची सर्वात प्रिय असणारी माझी आजी मंजुळाबाई वामनराव पवार पाटील आमच्या सर्वांची लाडकी काकू.पंचक्रोशीतील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचं परिचयाचे व्यक्तिमत्व म्हणजे काकूं.तिच्या विषयी लिहिताना माझे डोळे पाणावले आहेत.
आजी ही प्रत्येकाच्या घरातील असं व्यक्तिमत्व असते की,जी नातवावर अपार प्रेम व माया लावणार व सगळ्यांचा विचार करणार व्यक्तिमत्व. माझ्या आजोळच घराणं तसं नावाजलेल पवार घराणं. सधन शेतकरी कुटुंब अपार मातीवर प्रेम व निष्ठा असणार, पशुधनान नटलेलं कुटुंब तसं मोठंच. भाऊ,बहीण,चुलते,मुलं,नातवंड,पथरुंड असा मोठा परिवार. आजोबा शेतकरी परंतु, शिक्षणाची जागरूकता त्यांच्या मनात नेहमी असायची त्यांना त्यांची मुले,नातवंड भरपूर शिकून मोठे व्हावे असे मनात नेहमी आस असायची. स्वतः अशिक्षित असून सर्व शिक्षित असावेत असा ध्यास असलेले शिक्षणाबरोबर मुलांनी शेतीकडे लक्ष द्यावे हा त्यांचा नेहमी कटाक्ष असे. त्यांनी ज्याप्रमाणे मुलांना शिक्षण देवून संस्कार क्षम पिढी देण्याचे काम त्यांनी केलं.आजीचे शिक्षणाविषयी मत तेच, आम्ही शिकलो नाहीत पण पोरं भरपूर शिकावित, मोठं व्हावीत अस दोघांनाही वाटत असे आणि पोर, नातवंड,पथरुंड ही शिकली आहेत, शिक्षण घेत आहेत, आज चांगल्या पदावर आहेत.
आमची आजी म्हणजे काकू आज या जगात नसली तरी, तिची मायेची सावली आमच्या प्रत्येकाच्या मनात घर करून गेली आहे‌. आज तिला जाऊन वर्ष जरी झाले असले तरी, तिने फिरवलेला मायेचा हात मी व आम्ही सर्व भावंडे कधीच विसरू शकत नाही. आम्हा सर्व नातवंडावर अपार जीव लावणारी काकू डोळ्यासमोर उभी राहते ती लुगडं नेसलेल्या आणि हसरा चेहरा, कपाळाभरुन कुंकू लिहिलेली ती तिच्या डोळ्यात सदैव असलेले आपलेपणामुळेच. मला आजही आठवते.आम्ही सर्व भावंडे सुट्ट्यात आजोळी जात असू. आम्ही दिसताच क्षणी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मावत नसे. लगेच जवळ घेत चेहऱ्यावरून हात फिरवत नकळत दृष्ट काढणारी आणि लगेच चुलीवर दूध गरम करून पावासाठी चटकन पैसे कुणाला तरी देऊन ग्लासभर दूध देत, त्यासोबत पाव देणारी काकू मला आजही आठवते, ते प्रेम, ती माया आता कधीच भेटणार नाही, पण तिची प्रत्येक आठवण मनात घर केल्याशिवाय राहत नाही, हे नक्की. संस्कारक्षम पिढी घडवण्याचं काम तिने अशिक्षित असतानाही शिक्षणाचा मोल जाणत केलं, तिच्या संस्कारामुळेच आज प्रत्येक क्षेत्रात आम्ही सर्व सर्वजण आहोत हे विसरता येणार नाही. अनेकांचे जीवन समृद्ध करणारी हळव्या मनाची काकू विषयी लिहिताना माझे डोळ्याचे काट पाणवली आहेत. भावविवश होऊन मी लेखन करत आहे, तिच्याविषयी लिहिताना मनात कर्तबगारीचा,तिच्या कुटुंबवत्सलतेचा,संयमीपणाचा, प्रेमाचा भाव मला आज फार काही सांगून जातो.
आई सांगते, आम्ही सर्व भावंडे सकाळी उठायच्या अगोदर काकू आमच्यासाठी तयार असायची, चुलीपुढे भाकरी बनवायचा आवाज ऐकून इतरही लहानगे जागे व्हायचे. चुलीपुढं तापलेले गरमागरम दूध भाकर खाऊन आम्ही भाकरी बांधून आपापल्या कामाला निघून जात असू. तिच्या आठवणी सांगताना आम्हा सर्वांचे डोळ्यांच्या कडा नकळत भरून येतात हे आजही तितकच खरं आहे.
आम्हा सर्वांवर अपार प्रेम करणाऱ्या काकूची आठवण काढताना जीव कासावीस व डोळे पाण्याने भरतात हे नक्कीच. ती जाऊन आज वर्ष झालं पण आजही ती आमच्यात आहे असा सतत भास आम्हाला होतो.मी तिथे असताना मला हळूच खर्चायला पैसे देऊन मायने जवळ घेणारी माझी काकू आज या जगात नसली तरी आमच्या प्रत्येकाच्या ती मनात आहे. मला फोनवर गप्पा मारणारी व आपुलकीने विचारपूस करणारे काकू चा फोन आता कधी येणार नाही पण तिचा आवाज, तिची आठवण आल्याशिवाय आम्हाला राहत नाही, तिचा हसरा चेहरा मी कधी विसरणार नाही, तिच्यापासून घरी निघताना तिच्या डोळ्यात मी वापस येण्याची आस पहिली आहे, ती आठवण मनात घर करुन जाते. आज काकु जरी देहरूपी आमच्यात नसली तरी तिने दिलेले संस्कार सोबत घेऊन आठवण मनात साठवलेल्या आहेत. सहनशीलता,सात्विकता, दयाळू, हळवेपणा, ममत्व, कर्तव्यपरायता अशा एक ना अनेक गुणांचा महासागर काकू होती. ती तिच्या प्रत्येक गोष्टीतून, कष्टातून नकळतपणे मनात उतरत राहिली. द्वेष, मत्सर, उणें दुने,राग याचा स्पर्श कधी काकूला झाला नाही व तिने स्वतःला होवू हि दिला नाही. खूप मोठे कुटुंब तिने तिच्या प्रेमाच्या,मायेच्या धाग्याने एकत्र बांधून ठेवलं हे तितकेच खरे आहे. मला तिचा एवढा सहवास लाभला आहे. मला जमल तेवढं लेखन बद्ध करण्याचा मी प्रयत्न करताना माझे डोळे पाणावले आहेत,मन भरून आले आहे, माणूस नेहमी आपल्या कर्तुत्वाने मोठा होत असतो म्हणून कोणत्याही माणसाचे सदैव कर्तृत्वच मोठे असते, म्हणून कर्तृत्व संपन्न व्यक्ती समाजासाठी हितकारक असते हे ती नेहमी सांगे, म्हणूनच आम्ही सर्वजण आज आपापल्या क्षेत्रात काम करत आहोत. आज जरी आमच्यात काकु नसली तरी तिची आठवण नेहमी आल्याशिवाय राहणार नाही हे नक्कीच.

– राहुल मोरे