वाशिम, दि. १६ : जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोना बाधितांच्या संख्या अधिक गतीने वाढली आहे. रुग्ण वाढीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडणे आवश्यक असून याकरिता जिल्ह्यातील शहरी भागांविषयी घेण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयाची व जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. जिल्ह्यातील कोरोना संसर्ग विषयक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहायक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्यात जूनपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले असून रुग्ण वाढीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यातील २ शहरांमध्ये पूर्णतः लॉकडाऊन करण्याचा व इतर ४ शहरांमध्ये दुकानांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी या उपाययोजना आवश्यक असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. बाधित रुग्णांमध्ये जिल्ह्याबाहेरून आलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची संख्या अधिक आहे. त्यामुळे जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी करून विनापरवानगी कोणीही जिल्ह्यात येणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची काळजी घ्यावी. त्यांना मास्क, हातमोजे, फेसशिल्ड आदी पुरविण्यात यावे. तसेच कोरोना बाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर योग्य उपचार करून त्यांची काळजी घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. मास्क न वापरणारे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना अथवा आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत.
भविष्यात जिल्ह्यात कोरोना विषयक चाचणीसाठी वैद्यकीय प्रयोगशाळा सुरु करणेसाठी नियोजन करावे, कोविड नियंत्रणासाठी आवश्यक कंत्राटी पदभरतीची प्रक्रिया गतीने करावी. जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटरमध्ये आरोग्य, स्वच्छता, भोजन सुविधा चांगल्या प्रतीच्या पुरविण्यात याव्यात. यासंबंधित अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, अशा सूचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.
पावसामुळे नुकसान झाल्यास त्वरित पंचनामे करा
जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण चांगले आहे. मात्र, काही ठिकाणी कमी वेळात अधिक पाऊस पडल्याने पावसाच्या पाण्यामुळे शेती, घरांचे नुकसान होण्याची शक्यता असते. अशा नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी दिल्या. तसेच आज शेलूबाजारमध्ये पावसाचे पाणी घरांमध्ये घुसल्याचे, तसेच परिसरातील शेतीचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली असून याठिकाणी नुकसान झाले असल्यास पंचनामे करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात, असे पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.
विमा योजनेतील सहभागासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा
गतवर्षी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे १४७ कोटी रुपये नुकसानभरपाई मिळाली. यंदा या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२० पर्यंत असून कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी स्वतःहून या योजनेत सहभागी होणे आवश्यक आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या माध्यमातून जनजागृती मोहिम राबवून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या. यावेळी त्यांनी खरीप पीक कर्ज वाटपाचा आढावाही घेतला.
जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाय योजनांची माहिती दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मीना यांनी कोरोना नियंत्रणासाठी जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली, तर पोलीस अधीक्षक श्री. परदेशी यांनी कायदा व सुव्यवस्था विषयक बाबींची माहिती दिली.