प्रशासकीयमहाराष्ट्र राज्य

विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश

नागपूर, दि. १७ :  अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने इयत्ता दहावी तसेच बारावीच्या  विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक सत्रात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणारी जात पडताळणी प्रमाणपतत्रे वितरित करण्यासाठी अशी प्रकरणे  तातडीने निकाली काढावीत, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

येथील मुख्यमंत्री सचिवालयाच्या समिती कक्षात नागपूर, गडचिरोली व अमरावती  अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीद्वारे गोवारी (गोंड गोवारी) जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणींबाबत श्री. पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे उपसंचालक तथा सदस्य सचिव मनोज चव्हाण, आदिवासी गोवारी संघर्ष कृती समितीचे संयोजक दामोदर नेवारे, तक्रारदार नारायण सहारे, मारोतराव वाघाडे, वासुदेव नेवारे, गजाना कोहळे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील इयत्तेत प्रवेशासाठी नोंदणी केल्यानंतर दिलेल्या मुदतीत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. लॉकडाऊन काळात प्रमाणपत्र मिळविणे विद्यार्थ्यांना गैरसोयीचे होत असल्याने विद्यार्थ्यांसमोर प्रवेशाचा मोठा पेच निर्माण झालेला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता समितीने तातडीने जात पडताळणी प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावेत. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होता कामा नये. तसेच जातपडताळणी प्रमाणपत्रांबाबत ज्यांच्या तक्रारी आहेत, त्या प्रकरणांची खात्री करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशा सूचना श्री. पटोले यांनी यावेळी दिल्या.

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसह अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती अशा सर्व घटकांतील विद्यार्थ्यांनाही जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अनेक अडचणी येऊ शकतात हे लक्षात घेऊन मराठा समाजासह अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती अशा सर्व घटकांतील सर्व विद्यार्थ्यांना सूट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबत उपस्थित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले. अमरावती अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने  प्रमाणपत्राची प्रकरणे त्वरित निकाली काढावीत, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

( वृत्त तारीख आणि वेळ – 2020-07-17 19:32:49 )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button