प्रशासकीयमहाराष्ट्र राज्य

नागपूर: जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था चोख ठेवा ,विभागीय आयुक्त कार्यालयात घेतला विविध कामांचा आढावा– अनिल देशमुख

नागपूर, दि. 18 : येत्या काळात गणेशोत्सव, बकरी ईद आदी महत्त्वपूर्ण सार्वजनिक उत्सव सुरु होत आहेत. त्यादरम्यान राज्य शासनाने नुकत्याच मार्गदर्शक सूचना निर्देशित केल्या असून, त्यांची अतिशय कडक अंमलबजावणी करताना कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संबंधित यंत्रणेला दिलेत. विभागीय आयुक्त कार्यालयात आज कायदा व सुव्यवस्था आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, खासदार कृपाल तुमाने, आमदार प्रकाश गजभिये, आमदार विकास ठाकरे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलीस सहआयुक्त नीलेश भरणे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. व्ही. डी. पातूरकर, डॉ. अविनाश गावंडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

राज्याच्या तुलनेत नागपूर जिल्ह्याची कोरोनाबाधितांची संख्या, मृत्यूदर कमी असून, रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण चांगले आहे. येथील प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणेने अतिशय चांगले काम केले असून यापुढेही योग्य समन्वय राखावा. प्रशासकीय यंत्रणेने प्रतिबंधीत क्षेत्र घोषित केल्यानंतर अंमलबजावणी करताना लोकप्रतिनिधी व जनतेला विश्वासात घ्यावे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी वेळ द्यावा. त्यामुळे नागरिकांचा प्रशासकीय यंत्रणेविरोधात रोष राहणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्यात.

राज्याच्या तुलनेत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी असली तरीही दरम्यानच्या काळात त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. ती नियंत्रित करण्यासाठी नागपूरकरांनी लॉकडाऊनचे नियम न पाळल्याबद्दल गृहमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये नागपुरात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढला असून, तो येत्या काळात नियंत्रित करण्यासाठी प्रशासकीय व पोलीस यंत्रणेने कठोर लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.

प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी समन्वय ठेवावा – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

नागपूर कोरोना नियंत्रित ठेवण्यात यशस्वी ठरले असले तरीही लॉकडाऊनच्या काळात झालेल्या चुका टाळून प्रशासकीय यंत्रणेने योग्य समन्वय ठेवावा. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय टाळता येईल. त्यातून जनतेचा यंत्रणेवरील विश्वास वाढेल, त्यांमुळे कोरोनावर नियंत्रण ठेवण्यास जनतेचे सहकार्य लाभेल. सुरुवातीला नियंत्रणात राहिलेला कोरोना नंतरच्या काळात झपाट्याने वाढत असून पोलिसांनी नियमांची कडक अंमलबजावणी करावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केल्या.

जिल्ह्यात कोरोनाबाधित सापडल्यानंतर तो भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करताना प्रशासकीय यंत्रणेने प्रतिबंधित क्षेत्राचे स्वरुप लघू आणि मर्यादित ठेवावे. त्यामुळे इतर नागरिकांची गैरसोय टाळता येईल, असेही पालकमंत्री डॉ. राऊत यांनी सांगितले. आणि कोरोनावर नियंत्रण किळविणे सहजशक्के होईल.

लॉकडाऊन उठवल्यानंतर महानगरांमधून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कामगारांचे स्थलांतर झाले. त्यामुळे ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार झाला. तो रोखण्यासाठी यंत्रणेने लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी करताना, शेतकरी वर्ग अडचणीत येणार नाही, याची काळजी घ्यावी. सध्या शेतीशी निगडीत कामासाठी, खते, कीटकनाशके खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना शहरात यावे लागत आहे. त्यावेळी पोलिस व प्रशासकीय यंत्रणेने त्यांची अडवणूक करु नये, अशा सूचना खासदार कृपाल तुमाने यांनी बैठकीत केल्या.

प्रतिबंधित क्षेत्रात कार्यवाही करताना महापालिका अधिकारी आणि पोलिस यंत्रणेने समन्वय साधून काम करावे. त्यासाठी त्यांनी समन्वय बैठका घ्याव्यात, अशा सूचना आमदार विकास ठाकरे यांनी केल्या. विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी जिल्ह्यात कोरोना काळात, कोरोना नियंत्रणासाठी पोलिस, प्रशासकीय यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेच्या समन्वयातून करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कार्यवाहींची मंत्रिद्वयींना माहिती दिली. ग्रामीण भागात जिल्हा प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी माहिती दिली. जिल्ह्यात कारोनो काळात पोलिसांनी प्रतिबंधात्मक केलेल्या विविध प्रकारच्या कार्यवाहींचा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आढावा घेतला. कारागृहातील कैद्यांची तपासणी, सायबर गुन्हे, मास्कविना फिरणा-या नागरिकांवर केलेली कार्यवाही आदी बाबींचा त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आढावा घेतला. लॉकडाऊन काळात पोलिस यंत्रणेने केलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती पोलिस सहआयुक्त नीलेश भरणे यांनी गृहमंत्री श्री. देशमुख यांना दिली.

( वृत्त तारीख आणि वेळ – 2020-07-18 18:35:53 )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button