प्रशासकीयमहाराष्ट्र राज्य

८२८८ पोषण परसबाग निर्मितीसह वर्धा जिल्हा राज्यात अव्वल

८२८८ पोषण परसबाग निर्मितीसह वर्धा जिल्हा राज्यात अव्वल
वर्धा, दि. १९ : ग्रामीण भागात गर्भवती, स्तनदा माता, बालक आणि किशोरवयीन मुले यांना आहारातून खनिज, लोह, मूलद्रव्ये, प्रथिने इत्यादी पोषकतत्वे मिळून त्यांचे सुव्यवस्थित पोषण व्हावे म्हणून राज्यभरात ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत उमेदच्या माध्यमातून कृतिसंगम प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत ग्रामीण भागात पोषण परसबाग निर्मिती करण्यात आली असून 8288 परसबागांची निर्मिती करून वर्धा जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.

शरीराला पोषकतत्वे न मिळाल्यामुळे अनेक व्याधी निर्माण होतात. लोह, खनिज आणि प्रथिनांच्या कमतरतेमुळे रक्तक्षय, रातांधळेपणा, गलगंड, असे आजार महिला, बालके व किशोरवयीन मुली यांच्यामध्ये दिसून येतात. ग्रामीण आणि शहरी झोपडपट्टी भागात अपुऱ्या पोषणामुळे जन्मताच किंवा जन्मानंतर बालके आणि किशोरवयीन मुले व्याधीग्रस्त झालेली पाहायला मिळतात.म्हणूनच ग्रामीण भागात पोषणाची आणि आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी विशेषतः गरोदर माता,स्तनदा माता,६ ते २४ महिने वयोगटातील बालके आणि किशोरवयीन मुली यांच्या आहारामध्ये नियमित विषमुक्त, ताजी आणि पोषकमूल्ये असलेली भाजी व फळे असणे आवश्यक आहे.

राज्य शासनाने या बाबीवर काम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून कृतिसंगम प्रकल्पांतर्गत २५ जून ते १५ जुलै २०२० दरम्यान माझी पोषण परसबाग विकसन मोहीम” हा उपक्रम राज्यभर राबविला. यात जीवनचक्राच्या योग्य वेळी योग्य व्यक्तीने योग्य कृती अंमलात आणावी म्हणून जनजागृती करण्यात आली. तसेच वैयक्तिक स्वच्छता,हात धुण्याच्या पद्धती व सवयी, शौचालयाचा वापर, स्वयंपाक घराशेजारी स्वच्छ पाण्याच्या स्त्रोताची उपलब्धता याबाबत जाणीवजागृती कारण्यासोबत उच्च दर्जाचे जैविक पद्धतीने पिकवलेल्या पोषणयुक्त भाज्या व फळे गरोदर महिला,स्तनदा माता,६ ते २४ महिन्यातील बालकांच्या तसेच किशोरवयीन मुलींच्या आहारामध्ये आणण्यासाठी भर देण्यात येत आहे.

वर्धा जिल्ह्यात उमेदच्या माध्यमातून ८ तालुक्यात कृतिसंगम विभागांतर्गत अन्न,आरोग्य,पोषण आणि स्वच्छता ह्या विषयावर कार्य केले जात आहे.गर्भधारणा ते बाळाच्या २ वर्षादरम्यान एकूण १००० दिवसाच्या कालावधीमध्ये पोषणाची स्थिती सुधारण्यासाठी कृतिसंगम प्रकल्पाच्या माध्यमातून लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.

भाज्या आणि प्राणीजन्य अन्न (मांस,अंडी,मासे) याचे कुटुंब स्तरावर उत्पादन आणि उपभोग करण्यासाठीची आणि शेतीवर आधारित समुदायामध्ये अंमल करण्यायोग्य पूरक पद्धत म्हणजे घराशेजारीच अन्नाचे उत्पादन मॉडेल तयार करणे. याचा विचार करून स्वयं सहाय्यता समूहांच्या माध्यमातून कुटुंब व सामूहिक स्तरावर पोषण परसबागेचे विकसन हे महत्वाकांक्षी काम या मोहीमे दरम्यान उमेद अभियानामार्फत करण्यात आले.

वर्धा जिल्ह्याला उमेद राज्य अभियान व्यवस्थापन कक्षाकडून १६४० लक्षांक प्राप्त झालेले होते. त्याअनुषंगाने वर्धा जिल्ह्याने प्रत्येक तालुक्याला १००० परसबागांचा लक्षांक देण्यात आला होता. अभियानातील कार्यरत सर्व अधिकारी,कर्मचारी,विविध विषयाच्या समूह संसाधन व्यक्ती यांनी उल्लेखनीय कार्य करून वर्धा जिल्ह्यात ही मोहीम यशस्वीपणे राबवली.

माझी पोषण परसबाग विकसन मोहिमेमध्ये वर्धा जिल्ह्याने लक्षांकापेक्षा पाचपट म्हणजे ८२८८ परसबाग विकसित करुन राज्यात परसबाग निर्मितीत प्रथम क्रमांक साध्य केला. तालुकानिहाय परसबागेची संख्या अशी- वर्धा १०२८, देवळी ८३०, सेलू १११६, समुद्रपूर ११४०, आर्वी १०२९, आष्टी १०३२, कारंजा १०८२, हिंगणघाट १०३१ अशी आहे.

स्वाती वानखेडे, जिल्हा अभियान व्यवस्थापक उमेद वर्धा- गरोदर आणि स्तनदा काळातील स्त्रीचे पोषण,मूलभूत स्तनपान आणि पूरक पोषण आहाराच्या पद्धती,आजारी आणि कुपोषित बालकांच्या पोषणाची काळजी, नियंत्रण इत्यादी बाबींवर कृतीपूर्वक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सदर मोहीम डॉ.सचिन ओम्बासे-मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद वर्धा आणि सत्यजीत बडे- प्रकल्प संचालक,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,वर्धा यांच्याकडून वेळोवेळी मिळालेल्या अमूल्य मार्गदर्शनामुळे यशस्वी झाली.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.