Last Updated by संपादक
नागपूर, दि. 20 : गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील कृषी पंपांना 16 तास वीज पुरवठा करण्यासाठी वीज नियामक आयोगाला प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यासह सहव्यवस्थापकीय संचालक श्री. रंगारी, गोंदिया परिमंडळाचे श्री. शिरकर, महापारेषणचे संचालक रमाकांत मेश्राम उपस्थित होते.
सध्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. भाताची रोवणी होत आहे. मात्र, आठ तास वीज पुरवठ्याने शेतीची कामे पूर्ण होत नसल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. नक्षल भागातील शेतकऱ्यांना सोळा तासासाठी वीज उपलब्ध झाल्यास त्यांना मदत होईल त्या दृष्टीने ऊर्जा विभागाने कार्यवाही करावी.
नक्षल प्रवण भागातील कृषीपंपाना सोळा तास वीज पुरवठ्यासाठी वेगळा प्रस्ताव एका आठवड्याच्या आत सादर करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री श्री.राऊत यांनी दिले.
महापारेषणच्या साकोली उपकेंद्र व देवरी उपकेंद्रासाठी जागा निश्चित करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
*****