कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशांचे कठोर पालन करा – गृहमंत्री अनिल देशमुख

Last Updated by संपादक

अँटीजेन टेस्ट वाढवण्याचे आदेश; मास्क व सुरक्षित अंतर अनिवार्य                                                

नागपूर, दि. 20 : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशाचे कठोर पालन करणे गरजेचे आहे. अर्थ व्यवस्था बळकट व्हावी व जनजीवन पूर्वपदावर यावे यासाठी ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरु आहे. मात्र नागरिक निर्देशांचे पालन करत नाहीत ही खेदाची बाब असून गर्दी टाळणे, मास्क व सुरक्षित अंतर आदी नियमांचा भंग करणाऱ्यांवर सुद्धा कडक कारवाई करावी, अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रशासनाला दिल्या.

काटोल उपविभागीय कार्यालयात, आयोजित कोरोना व कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीत ते बोलत  होते. जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, तहसीलदार अजय करडे व श्री. गाडे यावेळी उपस्थित होते.

सुरुवातीच्या काळात शहरी भागात असलेला कोरोना आता ग्रामीण भागात पसरला असून नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे श्री.देशमुख म्हणाले. ‘अनलॉक’ म्हणजे मुक्त संचार नसून त्याची व्यवहारासोबत सांगड घालून दिनचर्या ठरविणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. काटोल व नरखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात अँटीजेन टेस्ट करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. कोरोनाचा संक्रमण रोखण्यासाठी जास्तीत-जास्त आरोग्य तपासण्या करण्यात याव्यात, तसेच  बाजारपेठेत मास्क व सुरक्षित अंतर नियमांचे पालन सक्तीचे करावे, असे ते म्हणाले.

दुकाने वेळेवर बंद होतील याची खबरदारी घेण्यात यावे असे सांगून शहरी व ग्रामीण भागात गस्त वाढविण्यात यावी असे निर्देश त्यांनी पोलीस विभागाला दिले. मास्क न वापरणाऱ्या व वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. नागपूर रोडवर असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी येथे क्वारंटाईन सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न करावे, असे त्यांनी सांगितले.

लोकांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे मुंबईत कोरोना आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश प्राप्त होत आहे. गर्दीच्या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक होण्याचा धोका संभवतो. अशा वेळी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. लॉकडाऊनच्या काळातही नागरिकांनी प्रशासनास सहकार्य केले. आता अनलॉक प्रक्रिया सुरु झाली असून आता कोरोना ग्रामीण भागापर्यंत आला आहे. आता अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता असून लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन कोरोना संक्रमण थोपविण्यासाठी काम करण्याचा मानस गृहमंत्र्यांनी व्यक्त केला.

नागपूरच्या ग्रामीण भागात मध्ये 593 व्यक्ती कोरोनाबधित आहेत. यात काटोलला 75 व नरखेड येथे 13 आहेत. तर जिल्ह्यात 199 रुग्ण बरे झाले आहेत. यात काटोल येथील 34 व नरखेड येथील 6 व्यक्तींचा समावेश आहे. ग्रामीण भागात कोरोनामुळे आतापर्यंत 4 मृत्यू झाले आहेत, त्यातील एक काटोल तालुक्यात झाला आहे. काटोल- नरखेड तालुक्यात संपर्क शोध मोठ्या प्रमाणात होत आहे. पारडसिंगा येथे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले असून याठिकाणी सध्या 46 रुग्ण उपचार घेत आहेत तर 76 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. नागरिकांना शिस्त लागावी म्हणून मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून 2 लाख 10 हजाराचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी दिली. यावेळी लोकप्रतिनिधींनी विविध सूचना मांडल्या. या सूचनांची प्रशासनाने दखल घेऊन कार्यवाही करावी, असे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले.

पुढील काही काळ कोरोना सोबत काढावा लागणार असून नियमांचे पालन, सुरक्षित अंतर राखणे, मास्क वापरणे व नियमित हात धुणे हाच यावर उत्तम उपाय असल्याचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी सांगितले. लॉकडाऊनपेक्षा मनाचा लॉकडाऊन म्हणजे निर्देशांचे पालन करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यात सर्व्हेक्षणाचे काम निरंतर सुरु असून सर्व्हेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.  पोलीस अधीक्षक(ग्रामीण) राकेश ओला यांनी कायदा व सुव्यवस्थेचा तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पातूरकर यांनी वैद्यकीय आढावा यावेळी सादर केला. या बैठकीत विविध विषयावर चर्चा झाली. 

******

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.