प्रशासकीयब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

आगामी काळात येणारे उत्सव ‘आरोग्य उत्सव’ म्हणून साजरे करावेत - पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे

* जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे

बुलडाणा, दि.20 (जिमाका) : आगामी काळात बकरी ईद, गणेशोत्सव, मोहरम, पोळा, गौरी आदी महत्त्वाचे सण साजरे करण्यात येणार आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारच्या गृह विभागाने मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. त्याचे कटाक्षाने पालन सर्वांकडून झाले पाहिजे. आगामी काळात येणारा प्रत्येक उत्सव हा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘आरोग्य उत्सव’ म्हणून साजरा केला पाहिजे, असे आवाहन पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आज केले. 

जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जि.प.अध्यक्षा मनिषा पवार, खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेताताई महाले, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील – भुजबळ उपस्थि‍त होते. तसेच यावेळी सभागृहात आमदार ॲड आकाश फुंडकर, माजी आमदार सर्वश्री शशीकांत खेडेकर, हर्षवर्धन सपकाळ, राहुल बोंद्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जालींधर बुधवत तसेच जिल्हास्तरीय शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थि‍त होते.

प्रशासनाने या काळात जिल्हा सीमांवरील तपासणी नाके अधिक सतर्क करण्याच्या सूचना करीत पालकमंत्री म्हणाले, त्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवला पाहिजे. या नाक्यांवर आरोग्य कर्मचारी राहतील याची काळजी घ्यावी. गणेश मंडळानी यावर्षी कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करू नये. सार्वजनिक गणेशोत्सवाकरीता परवानगी देण्यात येणार नाही. सर्वांनी घरातच गणेशोत्सव साजरा करावा. तसेच बकरी ईदला मोठ्या प्रमाणात कुर्बानी दिली जाते. परंतु यावेळस कोणत्याही प्रकारची कुर्बानी देवू नये. ईदची नमाजही घरातच अदा करावी. आपापल्या परि‍सरात या उत्सवांच्या काळात आरोग्य शिबिरे घ्यावीत, उत्सवाचे स्वरूप खूप साधे ठेवावे, गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच मास्क लावणे, शारीरिक अंतर ठेवणे हे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणजे कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही.

यावेळी खासदार प्रतापराव जाधव म्हणाले, गर्दीची ठिकाणे टाळावीत. प्राधान्यक्रमाने कामाचे स्वरुप ठरवावे. अनावश्यक गर्दी होऊ देवू नये. कोणत्याही प्रकारचा नकारात्मक संदेश जनतेपर्यंत पोहोचणार नाही याविषयी पोलीस प्रशासनाने काळजी घ्यावी. जनतेनेही प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. आमदार संजय गायकवाड यांनी आगामी काळातले उत्सव घरातल्या घरात साध्या पद्धतीने साजरे करा तसेच जनतेने लॉकडाऊन संदर्भातले आदेश काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन  केले.  

जिल्ह्यात शनिवार व रविवार संपूर्ण संचारबंदी ठेवण्याबाबत किंवा आठवडी बाजाराच्या दिवशी कडक कर्फ्यु ठेवण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

जि.प.अध्यक्षा मनिषा पवार म्हणाल्या, आगामी उत्सव काळात कोरोनाला लढा देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असून सर्वधर्म एकता नागरिकांनी जोपासावी. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील- भुजबळ यांनी शांतता समितीच्या बैठकीचे प्रास्ताविक केले. ते म्हणाले,आगामी काळात सण उत्सव मोठया प्रमाणात साजरे केले जाणार आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाभर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सण उत्सव घरातच साजरे करावेत. गणेश मंडळांनी सार्वजनिक गणेशोस्तव साजरा न करता आपापल्या घरातच गणेशोत्सव साजरा करावा. जेणेकरुन कोरोनाला आळा घालता येईल. गणेश मंडळांना प्रशासनाकडुन कोरोना काळात सहकार्य केल्याबद्दल प्रमाणपत्राचे वितरण देखील करण्यात येईल. गणेश मंडळांकडुन उत्सव कालावधीत योग्य ती खबरदारी घेऊन शारीरिक अंतर राखुन रक्तदान शिबीरांचे आयोजन करावेत. तसेच मुस्लीम बांधवांनी रमजान महिन्यामध्ये प्रशासनाला सहकार्य केले, ते पुढेही असेच मिळत राहील. बांधवांनी सर्व धर्म सम भावाची भावना जोपासली त्याबद्दल त्यांचे आभार मानत कौतुकही यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी केले.

जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यावेळी म्हणाल्या, जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय केले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखणे हेच सध्या आपल्या सर्वांचे सर्वेाच्च प्राधान्य आहे. संपूर्ण राज्यात कलम 144 लागू केलेले आहे. हे कलम आपल्या सर्वांच्या हितासाठीच आहे. शासन आणि प्रशासन याबाबतीत कमालीचे सतर्क असून जनतेने सर्व प्रतिबंधात्मक आदेशांचे पालन करावे. गत काळात बुलडाणेकरांनी कमालीचा संयम दाखवत सहकार्य केले आहे. तसेच ते पुढेही मिळत राहणार आहे.  जिल्हाधिकारी  यांनी जिल्हास्तरीय शांतता समिती सदस्यांच्या निर्णयांचे स्वागत केले.  याप्रसंगी जिल्हास्तरीय शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.      

पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या आवाहनाला आयएमएकडून सकारात्मक प्रतिसाद

बुलडाणा, दि.20 (जिमाका) :  जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने जिल्ह्यात देखील हैदोस घातला आहे. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एक हजाराच्या जवळजवळ पोहोचली आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता खाजगी डॉक्टरांचे सहकार्य घेणे गरजेचे ठरणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील डॉक्टरांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी करताच त्यांच्या या आवाहनाला डॉक्टरांच्या आयएमए (इंडियन मेडीकल असोसिएशन) या संघटनेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आयएमएच्या बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते.  बैठकीला जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रेमचंद पंडित, जिल्हा आयएमएचे डॉक्टर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्यातील कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांची हजाराकडे जात आहे. सध्या जिल्हा प्रशासनाने रुग्णांसाठी पुरेशी व्यवस्था केली आहे. परंतु जर का हा आकडा वाढला तर रुग्णांना सुविधा मिळावी, यासाठी खाजगी हॉस्पिटल ताब्यात घ्यावी लागणार आहेत.  खाजगी डॉक्टरांना देखील कोरोना रुगांना सेवा द्यावी लागेल.  पालकमंत्री यांच्या आवाहनाला आएमए संघटनेकडून गरज भासेल   तेव्हा – तेव्हा आम्ही प्रशासनासोबत सोबत उभे राहू, असा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आयएमएच्या सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्याचे यावेळी आश्वासन दिले.  बैठकीला संबंधित यंत्रणेतील अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.