महिलांचे ‘डिजिटल सक्षमीकरण’ ही काळाची गरज

Last Updated by संपादक

विभागनिहाय महिला आयोगाचे कार्यालय लवकरच– महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

मुंबई, दि २१ : स्मार्टफोन, इंटरनेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले असून त्याचा वापर वाढत असताना काही विकृती त्याचा गैरवापरही करत आहेत. बऱ्याचदा महिला या त्यांचे सोपे लक्ष्य (सॉफ्ट टार्गेट) असते. यामुळे सर्वांनाच विशेषतः युवती, महिलांना ‘डिजिटली  सक्षम’ करणे काळाची गरज झाली आहे, असे मत महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले. तसेच संकटग्रस्त महिलांना जलद न्याय मिळावा यासाठी राज्य महिला आयोगाचे कार्यालय प्रत्येक विभागस्तरावर लवकरच कार्यान्वित होईल, असेही त्या म्हणाल्या.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि ‘रिस्पाँन्सिबल नेटिझम’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डिजिटल स्त्री शक्ती’ या उपक्रमाचा शुभारंभ ॲड. ठाकूर यांनी ऑनलाईनरित्या वेबिनार माध्यमातून केला. या कार्यक्रमात राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव आस्था लुथरा, घनश्यामदास सराफ महाविद्यालयाचे अध्यक्ष अशोक सराफ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत आपटे, उपप्राचार्या लिपी मुखर्जी, रिस्पॉन्सिबल नेटिझमच्या संस्थापिका सोनाली पाटणकर, सहसंस्थापक उन्मेष जोशी आणि सराफ महाविद्यालयाचे 350 विद्यार्थी सहभागी झाले होते.

यावेळी मंत्री ॲड.ठाकूर म्हणाल्या, सध्या वेगळ्याच जगाला आपण सामोरे जात आहोत, सगळे बंद असताना मोबाईल हेच संवादाचे, संपर्काचे माध्यम झाले आहे. मात्र, ऑनलाईन गुन्हेही वाढत असल्याने सुरक्षित वापरासाठी समाजातील प्रत्येकाला जागरुक करणे गरजेचे आहे. ‘डिजिटल स्त्री शक्ती’ उपक्रमातून हा उद्देश साध्य होईल. लॉकडाऊन ते अनलॉक या काळात आयोगाने जवळपास ४०० तक्रारींवर कार्यवाही करत महिलांना न्याय, दिलासा मिळवून दिला आहे. मात्र आयोगाचे कार्यालय मुंबईत असल्याने कामकाजाचे विकेंद्रीकरण व्हावे, महिलांना सुलभ संपर्क करता यावा यासाठी लवकरच विभागस्तरावर महिला आयोगाचे कार्यालय सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘डिजिटल स्त्री शक्ती’ उपक्रमांतर्गत मुंबई, पुणे, ठाणे, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नाशिक अशा १० शहरातील १६ ते २५ वयोगटातील ५००० महाविद्यालयीन तरुणींना सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण देत ‘सायबर सखी’ म्हणून प्रशिक्षित करण्यात येणार आहे. इंटरनेटचा सुरक्षित उपयोग, सायबर गुन्हे आणि कायदा, मानसिक परिणाम, तांत्रिक बाबी आदीबाबत सायबर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी श्रीमती लूथरा यांनी सायबर विश्वात महिलाच अनेकदा सॉफ्ट टार्गेट ठरतात. त्यामुळे त्यांचे सायबर सक्षमीकरण आवश्यक असल्याने हा उपक्रम हाती घेतल्याचे सांगितले. ‘सायबर सखी’ म्हणून प्रशिक्षित होणाऱ्या या मुलीच अधिकाधिक जनजागृती करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

घनश्यामदास सराफ महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. सराफ आणि प्राचार्य डॉ.आपटे यांनी आपल्या संस्थेविषयी माहिती देत महिला सक्षमीकरणाच्या नव्या पर्वात शासनासोबत असल्याचे सांगितले.

प्रशिक्षणाच्या ‘सायबर गुन्हे आणि कायदा’ या सत्रात सोनाली पाटणकर यांनी हॅकिंग, फेक प्रोफाईल, स्टॉकिंग (सायबर पाठलाग), मॉर्फिंग (चित्रांशी छेडछाड), बॉडी शेमिंग, ट्रोंलिग, पोर्नोग्राफी अशा गुन्हा होऊ शकणाऱ्या संकल्पना विशद करुन सांगितल्या. अशा गोष्टींचे होणारे गंभीर मानसिक परिणाम यावरही चर्चा केली. महिलांविरोधात गुन्हे होत असले तरी अनेकदा तरुणींच्या हातूनही प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे असे प्रकार घडतात जे शिक्षेस पात्र आहेत या पैलूबाबतही मार्गदर्शन केले.

‘सुरक्षा आणि सूचना’ या सत्रातून उन्मेष जोशी यांनी सुरक्षित इंटरनेट वापराबाबत माहिती दिली. व्हॉट्सॲप ते विविध बँकिंग ॲप वापरताना घ्यावयाची काळजी, फेक न्युज, चुकीचे फॉरवर्ड, मोबाईलचे अँटी व्हायरस अशा विविध घटकांबाबत मार्गदर्शन केले.

प्रशिक्षण वर्गाला तरुणींनी चांगला प्रतिसाद देत प्रशिक्षण सत्राच्या अखेरीस सायबर विश्वाबाबतच्या विविध शंकाचे तज्ज्ञांकडून निरसन करून घेतले. हा उपक्रम महिलांच्या संगणकविश्वातील सुरक्षित वावराला प्रोत्साहन देणारा ठरेल असे मतदेखील प्रशिक्षणार्थी तरुणींनी व्यक्त केले.

0000

//

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.