प्रशासकीयब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

दूध उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून नवीन योजना आणणार - मंत्री सुनिल केदार

मुंबई, दि.२१ : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून दूध उत्पादकांसाठी राज्य शासन नवीन योजना घेऊन येणार असल्याचे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

दूध दरप्रश्नी चर्चा करण्यासाठी  दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस  पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी खासदार राजू शेट्टी, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, वरिष्ठ अधिकारी, शेतकरी संघटनेचे प्रमुख तसेच राज्यभरातील विविध दूध संघांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते.

मंत्री सुनिल केदार यांनी आज राज्यातील विविध सरकारी आणि खाजगी दूध संघांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या समस्या जाणून घेतल्या. शासन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदतीसाठी गंभीर असून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी लवकरच नवीन योजना आणण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करून मंत्रीमंडळ बैठकीत मंजूरी मिळवण्यासाठीची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोरोनाच्या या संकटप्रसंगी शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. राज्य शासन त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध संघानेही कठीण परिस्थितीमध्ये जे शक्य असेल ती मदत व आपापल्या परीने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी दूध संघांना  केले.

000000

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.