प्रशासकीयब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

बुलडाण्यात २१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन Lockdown in Buldana till 21st August

बुलडाणा,  दि. 21 : जिल्ह्यात अलीकडच्या काळात कोरोना संसर्गग्रस्त रूग्णांचे प्रमाण वाढले आहे. संसर्गाची साखळी वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी दि. २१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२० च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण एक महिन्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे.तसेच प्रत्येक शनिवार व रविवार या दिवशी औषधालय, दवाखाने व दुध वितरण, संकलन वगळून इतर सर्व बाबींवर बंदी घालण्यात येत असून या दोन्ही दिवशी संचारबंदी लागू राहणार आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी सुमन चंद्रा यांनी आज दिले आहेत.   

तसेच सोमवार ते शुक्रवार या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात सर्व उद्योग, व्यवसाय आदी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू असणार आहेत. त्याच दिवशी दुपारी ३ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत दूध, वर्तमानपत्र वितरण आदी वगळता संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत कडक कर्फ्यु लागू असणार आहे. तसेच १ जुलै २०२० च्या आदेशामध्ये ज्या बाबी बंद राहतील, असे नमूद केले आहे. त्या बाबी दिनांक ३१ जुलै २०२० पर्यंत तशाच बंद राहतील. दवाखाने, औषधालय, वैद्यकीय तसेच अत्यंत आवश्यक मानवी कामासाठी बाहेर पडणारे नागरिक, आंतर जिल्हा वाहतूक / पासधारक वाहने व माल वाहतुक सुरू राहील. शहराच्या हद्दीबाहेरील सर्व पेट्रोलपंप २४ तास सुरू राहतील.

या काळात अत्यावश्यक असणाऱ्यांनीच बाहेर पडावे. विनाकारण कुणीही बाहेर फिरू नये. सर्वांनी चेहऱ्यावर मास्क किंवा स्वच्छ रूमाल वापरावा. चेहऱ्यावर काही बांधलेले नसल्यास दंड आकारण्यात येईल. सोशल डिस्टसिंगचे पालन करावे. अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या व्यक्तींना आवश्यकतेनुसार संचार करण्यास मुभा राहील. मात्र ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य आहे. कोणत्याही परिस्थितीत दोन व्यक्तीमध्ये किमान तीन फुटाचे अंतर ठेवणे बंधनकारक आहे. जिल्ह्यामध्ये संचार करण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात येत असल्यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी इंसीडेंट कमांडर यांची परवानगी आवश्यक असणार आहे. उपविभागीय दंडाधिकारी यांनी परवानगी देण्याकरीता विविध कार्यालयांचे मदतीने पासेस देण्याची व्यवस्था करावयाची आहे. तसेच ज्या विभागाशी संबंधीत कामकाज असेल त्या विभागास पासेस देण्याची परवानगी असेल. शासकीय कर्मचारी यांना कार्यालयीन कामासाठी ओळखपत्रावर परिभ्रमणास मुभा असणार आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस विभाग कार्यवाही करणार आहे. अत्यावश्यक सेवा व वस्तु देणाऱ्या वाहनांवर पासेस, स्टीकर्स वाहनावर लावणे आवश्यक आहे. या आदेशांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये, साथरोग अधिनियम १८९७ अंतर्गत व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये संबंधीतांवर कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.