प्रशासकीयब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

जिल्हा विकास समन्वय व नियंत्रण (दिशा) समिती बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी घेतला आढावा

अकोला,दि.२१ – केंद्रीय मानव संसाधन विकास राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांच्या अध्यक्षते खाली जिल्हा विकास समन्वय व नियंत्रण समितीची (दिशा) सभा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात संपन्न झाली. श्री. धोत्रे यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनाचा आढावा घेतला.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, महापौर अर्चनाताई मसने, आ. गोवर्धन शर्मा, आ.रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, मनपा आयुक्त संजय कापडणीस,  जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुरज गोहाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या केंद्रशासनाच्या विविध योजना व कार्यक्रमांचा जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा सादर करण्यात आला. त्यात राष्ट्रीय भूमी अभिलेख विभागाकडून भूमी अभिलेखा आधुनिकरण कार्यक्रमाअंतर्गत १०० टक्के अभिलेख्यांचे स्कॅनिंग करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली.  तसेच जिल्ह्यात ८७ हजार६९७ मिळकत पत्रिका असून  त्यांच्या संगणकीकरणाचे काम पुर्ण झाले आहे. मागणीनुसार त्या जनतेत वितरीत करण्यात येत असतात, असे सांगण्यात आले.

पंडीत दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेअंतर्गंत माळेगाव बाजार, पिंपरी खुर्द, अकोली जहागीर, कान्हेरी सरप व कुरम येथील नवीन पाच उपकेन्द्राचे काम पूर्ण करण्यात आले असून उपकेन्द्र कार्यान्वित झाले आहे. तसेच उपकेन्द्र रोहित्रांची क्षमता वाढ करण्यामध्ये माना, कारंजा रमजान पुर, पिंजर व निंबा येथील चारही उपकेन्द्राची क्षमता वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती विद्युत वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता यांनी दिली.

अकोला येथील रेल्वे मालधक्का स्थलांतर त्वरीत बोरगांव मंजू येथे करण्यात यावे, अशा सूचना मा. धोत्रे यांनी रेल्वे विभागाला दिल्या. डाबकी रोड येथील उड्डाण पुलाचे काम त्वरीत पूर्ण करावे. तसेच अकोला रेल्वे स्टेशन आधुनिकीकरणासाठी सुरु असलेले कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, ग्रामीण पुरवठा योजना, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री पिक विमा योजना, दिनदयाल अंत्योदय योजना, पंडीत दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, समग्र शिक्षा अभियान योजना, एकात्मीक बाल विकास योजना, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, राष्ट्रीय स्वास्थ मिशन योजना, राष्ट्रीय सामाजिक सहायक कार्यक्रम आदी योजनांचा आढावा घेण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुरज गोहाड यांनी केले. यावेळी विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.