ॲन्टीजन टेस्ट किटसाठी पालकमंत्र्यांकडून १ कोटी मंजूर

Last Updated by संपादक

यवतमाळ, दि. २२ : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शहरी भागासोबतच आता ग्रामीण भागातसुद्धा या विषाणूचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. पॉझिटिव्ह लोकांच्या हाय रिस्क व लो रिस्क संपर्कातील नागरिकांच्या चाचण्या करण्याला प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. त्यानुसार विषाणू संशोधन व रोगनिदान प्रयोगशाळा (व्ही.आर.डी.एल.) व ॲन्टीजन टेस्ट किटद्वारे चाचण्या करण्यात येत आहेत. याची गती आणखी वाढविण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी १६ हजार किट खरेदी करण्यासाठी १ कोटी रुपये मंजूर केले आहे.

जिल्ह्यातील जवळपास सर्व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय यंत्रणेच्या वतीने नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येत आहे. प्रत्येक तालुक्यासाठी १ हजार याप्रमाणे १६ हजार ॲन्टीजन टेस्ट किटद्वारे आता नागरिकांची तपासणी करण्यात येईल, त्यामुळे पॉझिटिव्ह नागरिकांचा शोध घेण्यास मदत होणार आहे.

नागरिकांनी स्वत:हून टेस्टसाठी समोर यावे – पालकमंत्री

सध्याच्या परिस्थितीत काहीही लक्षणे असल्यास नागरिक स्वत:हून समोर येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र ही बाब स्वत:च्या व इतरांच्या जीवावर बेतू शकते, त्यामुळे नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप, श्वसनाचा आजार, सारी किंवा आय.एल.आय. यासारखी लक्षणे असल्यास स्वत:हून समोर येऊन आरोग्य यंत्रणेला माहिती द्यावी. तसेच जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांनी फिवर क्लिनिक मध्ये आपले नाव नोंदवून कोविड केअर सेंटर मध्ये तपासणी करून घ्यावी. रिपोर्ट निगेटिव्ह आला तर कोविड केअर सेंटरमध्ये भरती राहण्याची गरज नाही. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर त्यांच्यावर योग्य वेळेत उपचार करण्यास मदत होईल. जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या नेतृत्वात प्रशासन अहोरात्र काम करीत आहे. नागरिकांनीसुद्धा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री यांनी केले आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.