मानाच्या एकाच पालखीचा सर्वमान्य पर्याय-पालकमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

Last Updated by संपादक

शिवभक्तांना घरीच जलाभिषेक व सोमवारी रक्तदान करण्याचे आवाहन

अकोला,दि.२२(जिमाका)- येथील अनेक वर्षांची परंपरा असलेल्या श्री राजराजेश्वर पालखी सोहळा व कावड यात्रा कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर यंदा केवळ एकच मानाची श्रीराजराजेश्वराची पालखी काढून करण्यात यावा,असा सर्वमान्य पर्याय मान्य करण्यात आला. तसेच शिवभक्तांनी आपापल्या घरीच पिंडीवर जलाभिषेक करावा व सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून  दर श्रावण सोमवारी रक्तदान करुन सेवा कार्य करावे,असे आवाहन राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी केले.

श्री राजराजेश्वर पालखी व कावड यात्रा सोहळा आयोजनाबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस पालकमंत्री ना. कडू यांचे समवेत विधानपरिषद सदस्य आ. गोपिकिशन बाजोरिया, विधानसभा सदस्य आ. रणधीर सावरकर, आ. नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार,मनपा आयुक्त संजय कापडणीस, राजेश्वर मंदिराचे विश्वस्त ॲड रामेश्वर ठाकरे, राजेश्वर शिवभक्त मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सावजी तसेच विविध कावड पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या मंडळांचे पदाधिकारी  उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मते मांडली. अध्यक्ष चंद्रकांत सावजी यांनी सांगितले की, पालखी व कावड यात्रेची परंपरा ही संकटनिवारणासाठी सुरु झाली आहे. आताही आपण एका संकटाचा सामना करत आहोत. हे जागतिक संकट आहे. या संकटनिवारणासाठी आपले सगळ्यांचे योगदान असावे याहेतूने  मानाची एकच पालखी नेण्यात यावी व जलाभिषेक करण्यात यावा.

पालकमंत्री ना. बच्चू कडू म्हणाले की, सध्याचे संकट हे देशावरचे संकट आहे. आपण जरी धर्मासाठी असलो तरी धर्म हा राष्ट्रासाठी असतो. राष्ट्र संकटात असताना आपल्या श्रद्धेमुळे अन्य लोक धोक्यात येत असतील तर ते योग्य होणार नाही, हे तर देवालाही मंजूर नसेल. हा आजार नवीन आहे, या विषाणूचे आकलन पूर्णतः झालेले नाही. कोणताही धर्म हा मानवतेसाठीच आहे. अकोल्यातून काहीतरी चांगलं घडविण्याचा प्रयत्न करु या. यंदा एकच मानाची पालखी  निघेल व भक्त आपापल्या घरी जलाभिषेक करतील,असा सर्वमान्य पर्याय आपण निवडूया. तसेच यानिमित्ताने शिवभक्तांनी रक्तदान करावे असे आवाहनही ना. कडू यांनी केले.

या बैठकीचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.