श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ साठी एकूण १ कोटी १८ लक्ष निधी

Last Updated by संपादक

अमरावती –  कोविड -19 या महामारीचे संकट संपूर्ण जगावर कोसळले आहे. भारतापुरते बोलायचे झाले तर हे संकट महाराष्ट्रात सर्वाधिक असून महाराष्ट्र सरकार त्याचा मोठ्या धैर्याने सामना करीत आहे. या स्थितीत महाराष्ट्र सरकारच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्णय श्री शिवाजी शिक्षण संस्थेने  घेतला असून याचाच एक भाग म्हणून आज रुपये सदुसष्ठ लक्ष निधीचा दुसरा धनादेश श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख व कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले यांनी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोविड-19’ साठी दिला. शासनाच्या वतीने अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी तो स्वीकारला.यावेळी संस्थेचे सचिव शेषराव खाडे हेही उपस्थित होते. संस्थेने या कार्यासाठी आतापर्यंत एक कोटी अठरा लक्ष रुपयांचा निधी दिला आहे.

शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांनी आखून दिलेल्या मार्गावर चालताना श्री शिवाजी शिक्षण संस्थेने देशातील कठीण प्रसंगी नेहमीच सामाजिक जबाबदारीचे भान जपले आहे. आपले सामाजिक कर्तव्य जपताना संस्थेचे कार्यकारी परिषदेचे सर्व पदाधिकारी, आजीवन सदस्य यांच्या स्वेच्छा निर्णयानुसार आणि  संस्थेचे सर्व प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांच्या एक दिवसाच्या वेतनाइतकी रक्कम स्वेच्छेने या कार्यासाठी देण्याचे आवाहन संस्थेने केले होते. या आवाहनाला भरपूर प्रतिसाद मिळून आजपर्यंत एकूण एक कोटी अठरा लक्ष रुपयांचा निधी जमा झाला.कोविड -19 साठी संस्थेने एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती व प्रत्यक्षात अठरा लक्ष रुपये अधिकचा निधी देऊन या कार्यात मोठे योगदान दिले.शिव परिवारातील सर्व सदस्यांनी दिलेल्या या सहयोगाबद्धल संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी सर्वांना धन्यवाद देत भविष्यातही राष्ट्रीय कार्यात शिव परिवार असाच पुढे राहील,असा विश्वास पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

संस्थेद्वारे संचालित डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय या लढ्यात शासनाला संपूर्ण सहकार्य देत असून कोविड रुग्णांसाठी एकशे दहा बेडची व्यवस्था करण्यात आली असून वीस बेडचे आय सी यु, टेस्टिंग लॅब तसेच ऑक्सिजन सेंटरची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले यांनी यावेळी उपस्थित पत्रकारांना दिली.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.