औरंगाबाद जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19प्रशासकीयब्रेकिंग न्युज

औरंगाबाद: व्यापक जनजागृती आणि ॲण्टीजेन चाचण्यांमुळे कोरोना आटोक्यात – जिल्हाधिकारी उदय चौधरी

औरंगाबाद दि.23:आठवडा विशेष टीम― व्यापक जनजागृतीव्दारे लोकसहभागातून आणि ॲण्टीजेन चाचण्यांमुळे रुग्णांचे निदान वेळेत होण्याची संख्या वाढत असून कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज येथे सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्षांच्या प्रमुखांसोबतच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. चौधरी बोलत होते यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय, जिल्ह्यातील राजकीय पक्षाचे पमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. चौधरी म्हणाले, कोरोना मुक्तीसाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न सुरु असून लोकांच्या सहकार्यामुळे प्रशासनाच्या उपाययोजनांना यश मिळत आहे. सध्या जिल्ह्यात रुग्ण संख्या दुप्पट होण्याचे प्रमाण हे आटोक्यात आलेले आहे. त्यासोबतच मृत्युदर कमी करण्यात यंत्रणेला यश येत असून जिल्ह्याचा मृत्युदर 3.8 असून दोन टक्यांआ पर्यंत तो खाली आणण्यात आला आहे. हे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रशासन व्यापक प्रमाणात उपाय राबवत आहे. मृत्युदर रोखण्याला प्राधान्य देत मोठया प्रमाणात सर्वेक्षण आणि चाचण्यांद्वारे रुग्णांचे वेळेत निदान करणे, बाधितांचा दर कमी करणे आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढवणे या दृष्टीने प्रामुख्याने उपाययोजना राबवल्या जात आहे. सर्वेक्षण आणि चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने वेळेत रुग्णांना योग्य उपचार मिळणे शक्य झाले त्यासोबतच बाधितांमुळे वाढणारा संसर्गही नियंत्रणात आणणे शक्य होत आहे.ॲण्टीजेन चाचण्यांमुळे पावणे तीन हजार बाधीतांना शोधून काढता आले आहे. त्यामुळे आता गंभीर स्थितीतील रुग्णांचे प्रमाण मागच्या महिन्याच्या तुलनेत कमी झाले आहे. घाटीतील गंभीर स्थितीतील दाखल होणारे रुग्णांचे प्रमाण जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 60 च्या आसपास होते ते सध्या 20-25 रुग्णांवर झाले आहे.तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून ते 60-65 टक्क्यांपर्यंत सुधारले आहे. तसेच रुग्ण वाढीचे प्रमाण दुप्पट होण्याचे प्रमाण ही कमी होत आहे. बाधितांची टक्केवारी ही 25-26 वरुन 11.23 टक्यांंववर आली आहे. त्याचप्रमाणे घाटीतून गंभीर स्थितीतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ही खूप चांगले असल्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनूसार रुग्ण व्यवस्थापन, उपचार पध्दतीत आवश्यक बदल करण्यात येत आहे. संसर्ग रोखण्यासाठी ॲण्टीजेन टेस्ट उपयुक्त ठरत असून जिल्या सत 1 लाख 4 हजार टेस्ट करण्यात आल्या आहेत. तसेच वाळूज, शेंद्रा औद्योगिक परिसरातही येत्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात ॲण्टीजेन टेस्ट सुरु करण्यात येणार असून पहिल्या टप्यात सीआयआयने 20 हजार किटचा खर्च देण्याचे कबूल केले आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरीत सर्वांच्या चाचण्या करण्यात येणार आहे. शहरासोबत ग्रामीण भागातही ॲण्टीजेन चाचण्या मोठ्या प्रमाणात सुरु असून पूरेशा प्रमाणात या किट उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.
तसेच खाजगी रुग्णालयाचे दर शासनाने निश्चित केले असून ठरवून दिलेल्या दराने उपचार करणे खाजगी रुग्णालयांना बंधनकारक आहे. त्याची अंमलबजावणी योग्य पध्दतीने होण्यासाठी त्या ठिकाणी प्रशासनामार्फत देयक तपासणीसाठी लेखापरिक्षकांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता, आपल्या आरोग्याची कटाक्षाने काळजी घ्यावी, कोणतेही दुखणे, आजाराची लक्षणे अंगावर काढू नये. तातडीने आपली तपासणी करुन घ्यावी जेणेकरुन आपल्या सर्वांच्या सहकार्याने कोरोना संसर्ग यशस्वीपणे रोखण्यात यश येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
तसेच घाटीला औषध खरेदीसाठी निधी देण्यात आला असून रुग्णांना सर्व आवश्यक उपचार सुविधा देण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी कृतीशील आहे, असे सांगून जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी युरीया खताच्या उपलब्धते बाबत कोणत्याही प्रकारची काळजी करु नये. राज्यात सर्वांत जास्त युरीया औरंगाबाद जिल्ह्यात उपलब्ध असून 83 हजार 300 मे टन खत उपलब्ध झाले . तरी शेतकऱ्यांनी काळजी करु नये काही ठिकाणी शेतकऱ्यांनी गरजेपेक्षा जास्त खत खरेदी केल्याने तुटवडा सदृश्य स्थिती जाणवते. पण प्रत्येक तालुक्यात खतविक्री नियंत्रणासाठी समिती स्थापन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मनपा आयुक्त श्री. पांडेय यांनी शहरातील कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी ॲण्टीजेन चाचण्यामुळे खूप सहाय्य मिळत असल्याचे सांगून व्यापारी वर्गांच्या ॲण्टीजन तपासणीत 9 जणांचे प्राण वाचवणे शक्य झाले असून 20 हजारपैकी 508 व्यापारी बाधित निघाले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे सांगितले. तसेच शहराच्या सहा नाक्यांवर तसेच रेल्वेस्टेशनवर 24 तास तपासणी पथकाव्दारे ॲण्टीजन टेस्ट करण्यात येत आहे. त्यामध्ये आढळून आलेल्या 907 बाधीतांना आपण संसर्ग वाढवण्यापासून थांबवू शकलो तसेच त्यांना वेळेत उपचार मिळणे ही सहजतेने शक्य झाले आहे. तरी नागरिकांनी ॲण्टीजेन तपासणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करुन मनपातर्फे कोवीड केअर सेंटर, ताप तपासणी दवाखाने, एमएचएमएच ॲप, पालिकेच्या वॉर रुम, व इतर उपाययोजनांच्या उपक्रमाबाबतही श्री. पांडेय यांनी सविस्तर माहिती दिली.
यावेळी सर्व राजकीय पक्ष प्रतिनिधींनी प्रशासनामार्फत कोरोना मुक्तीसाठी राबवण्यात येत असलेल्या उपाय योजनाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच संसर्ग रोखण्यासाठी लोकसहभाग वाढवण्याच्या दृष्टीने,इतर अनुषंगिंक उपाययोजना राबवण्यात सहकार्य करण्यासाठी सर्व पक्षांनी आपले स्वयंसेवक, कार्यकर्ते देण्याबाबत तयारी दर्शवली. तसेच संसर्ग रोखण्यासाठी मनपाने व्यापाऱ्यांची ॲण्टीजेन तपासणी मोहिम सुरु केल्याबद्दलही समाधान व्यक्त केले.
मोहम्मद हीशम उस्मानी यांनी अॅण्टीजन टेस्ट करणारे पथकातील सर्वांची देखील अॅण्टीजन टेस्ट करावी, जेणेकरून त्यांच्या द्वारा तपासणी करताना इतरांना संसर्ग होणार नाही तसेच बकरी ईदच्या पाश्र्वभूमीवर जनभावना लक्षात घेता व्यवस्थापन समिती कडून देण्यात आलेल्या यादीनुसार मोजक्या लोकांना ईदगाह, मोठ्या मस्जिदमध्ये नमाज पठण करण्याची अनुमती द्यावी. तसेच मांस विक्री दुकानांमध्ये आणि मोठ्या मैदानात सामाजिक अंतराचे पालन करत जिवंत बोकड विक्रीसाठी परवानगी द्यावी,असे सांगितले. संजय केणेकर यांनी रुणांचे मनोबल वाढवण्यासाठी स्वयंसेवी संस्था, तज्ञांचे प्रमाण वाढवावे. रुग्णांमध्ये सकारात्मकता वाढवण्यासाठी उपक्रम राबविण्यात यावे. प्लाझ्मा थेरपी लवकरात लवकर सुरू करावी असे सांगितले. अरविंद अवसरमल यांनी बाधीत आढळलेल्या गल्लीत सर्वत्र सॅनिटायजरची फवारणी करावी. तसेच संजयनगर, मुकुंदवाडी येथील वस्तीतील मजूर, कामगार चार महिन्यांपासून घरी बेरोजगार आहेत, त्यांच्याकडे रेशनकार्डही नाही तरी त्यांना पूरक सहाय्य उपलब्ध करुन द्यावे. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना सर्व सुविधा द्याव्यात, त्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी,असे सांगितले. सुहास दाशरथे, डॉ.कल्याण काळे, बाळासाहेब थोरात, यांच्यासह सर्व प्रतिनिधींनी पूरेसा औषध साठा इंजेक्शनची उपलब्धता ठेवावी असे सांगितले. डॉ.कल्याण काळे यांनी मनपाचे मनुष्य बळ वाढवण्यात यावे तसेच जिल्हापरिषदेची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करावी.वार्ड निहाय अण्टीजन टेस्ट करण्यात याव्यात. तसेच जिल्हा परिषदेला पूर्ण वेळ आरोग्य अधिकारी नियुक्त करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र, रुग्णालय येथे पात्रताधारक स्टाफ नेमावा ,असे सांगितले. बाळासाहेब थोरात ,सुमीत खांबेकर यांच्यासह सर्व प्रतिनिधींनी जनजागृती अधिक प्रमाणात करून लोकांच्या मनातील कोरोनाबाबतची भीती घालवावी, चाचण्यांचे प्रमाण वाढवावे,असे सांगितले.चंद्रकांत खैरे,विश्वनाथ स्वामी यांनी वाढीव खाटांसह रुग्णालयांची व्यवस्था वाढवावी. क्वारंटाइन कक्षाच्या तसेच कोवीड सेंटरच्या सुविधा अधिक चांगल्या कराव्यात असे सांगितले. कैलास पाटील यांच्या सह सर्व प्रतिनिधींनी ग्रामीण भागातील जनजीवन कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे विस्कळीत झाले आहे ते प्राधान्याने पूर्वपदावर आणावे, उपचार सुविधा ग्रामीण भागात वाढवाव्यात असे सांगितले. किशोर थोरात यांनी वस्त्यांमधील खाजगी दवाखाने सुरु व्हावेत, जेणेकरून ताप सर्दीचे रुग्ण बरे होण्यास स्थानिक उपचार सुविधा उपलब्ध होईल,तरी खाजगी डॉक्टरांना दवाखाने सुरू करणे बंधनकारक करावे,असे सांगितले. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अजून जास्त प्रमाणात जनजागृती करावी, खाजगी रुग्णालयातील देयकांवर नियंत्रण ठेवण्यात यावे तसेच ,प्रशासनाला उपाययोजना राबविण्यात सहकार्य करण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांची मदत घ्यावी. कोरोना काळात चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, प्रमाणपत्र देण्यात यावी, असे संजय केणेकर, विजयराज साळवे, सुमित खांबेकर, बाळकृष्ण इंगळे,प्रदिप त्रिभुवन, सुधाकर शिंदे यांच्यासह सर्व प्रतिनिधींनी सांगितले. तसेच सर्व प्रतिनिधींनी शासकीय ठिकाणांच्या प्रवेशद्वारावर सॅनिटाइझर आणि ताप तपासणी सुविधा उपलब्ध ठेवावी.यासह अनेक उपयुक्त सूचना पक्ष प्रमुखांनी यावेळी केल्या. जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांनी सर्व सुचनांची योग्य ती दखल घेवून सुधारणा करण्यात येतील , असे सांगितले.
बैठकीस शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, विजय वाघचौरे, कॉग्रेसचे डॉ कल्याण काळे, मोहम्मद हीशम उस्मानी , राष्ट्रवादी कॉगेसचे कैलास पाटिल, विजयराज साळवे, भाजपचे संजय केनेकर, आरपीआय आठवले गटाचे अरविंद अवसरमल, किशोर थोरात, बाळकृष्ण इंगळे, मनसेचे सुहास दाशरथे,सुमित खांबेकर, सतनामसिंह गुल्हाटी, प्रहार जनशक्तीचे प्रदिप त्रिभुवन, सुधाकर शिंदे ,यांच्यासह संबंधित उपस्थित होते.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.