प्रशासकीयब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

विनामास्क फिरणार्‍यावर कडक कार्यवाही करण्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

अहमदनगर, दि. २४ – जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्ग रोखावयाचा असेल तर सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे. विनामास्क फिरणार्‍यावर कडक कारवाई करा, असे निर्देश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियमांचे तंतोतंत पालन करावे आणि स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी. सध्या जिल्ह्यात लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषयक सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार निलेश लंके, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे आदी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात सुरुवातीच्या दोन तीन महिन्यात कोरोना विषाणू संसर्ग आटोक्यात होता. त्यानंतर नागरिकांची बाहेरगावाहून ये-जा वाढल्याने संसर्गाचे प्रमाण वाढले. ते रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने चाचण्यांची संख्याही वाढविली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या वाढताना दिसत असली तरी आरोग्य यंत्रणा पूर्णपणे दक्ष आहे. सध्या जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये दरदिवशी ३०० चाचण्या केल्या जात आहेत. ही संख्या येत्या दोन दिवसांनंतर प्रतिदिन एक हजार अशी होणार असल्याने बाधितांच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या वेगाने करणे शक्य होईल आणि संसर्गाची साखळी तोडण्यात यश येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आगामी काळात कोणत्याही परिस्थितीत हा प्रादूर्भाव वाढणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांना आरोग्याबद्दलची काळजी घेतली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणार्‍या आणि स्वताबरोबरच इतरांचे आरोग्याला धोका पोचविणार्‍यावर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. विनाकारण घराबाहेर पडू नका, अनावश्यक संपर्क टाळा, घरातील वयोवृद्ध आणि लहान मुलांची काळजी घ्या, असे ते म्हणाले. श्रावण महिना  हा सणवारांचा महिना आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत स्वत:च्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्यावे. सणवार साधेपणाने आणि आपापल्या घरातच साजरे करावे, असे आवाहन त्यांनी जिल्हावासियांना केले.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, सध्या आपल्याकडे एकूण कोरोना वाधित २७७५ रुग्ण आहेत. त्यापैकी १४३६ जण कोरोना आजारातून बरे होऊन घरी परतले आहेत. याशिवाय, बाधित रुग्णांना ज्या कोविड केअर सेंटरमध्ये ठेवले जात आहे, तेथे त्यांना चांगल्या सुविधा पुरविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

जिल्ह्यातील नागरिक, जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेसह सर्वच शासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी हे कोरोना विषाणू प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. कोरोना विषाणू प्रादूर्भावामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीला सर्वांनी एकजुटीने तोंड दिले पाहिजे, असे ते म्हणाले.

रुग्णांची संभाव्य वाढती संख्या लक्षात घेऊन रुग्णालयातील बेड्सची संख्या, ऑक्सिजन सिलिंडरची उपलब्धता याचा आढावा घेतला असून पायाभूत सुविधा आणि औषधांचा पुरवठा कोठेही कमी पडणार नसल्याचे त्यांनी नमूद केले.

जिल्ह्यात रुग्णांकडून काही खाजगी रुग्णालये अवाजवी बील आकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारींची दखल घेतली असून अशा अवाजवी शुल्क आकारणार्‍या खाजगी रुग्णालयांचे ऑ़़डिट केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button