प्रशासकीयब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून एमएमआर क्षेत्रातील विविध प्रकल्पांचा आढावा

मेट्रो रेल्वे, मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, एकात्मिक तिकीट प्रणालीसह एमएमआरडीएच्या विविध प्रकल्पांबाबत चर्चा

मुंबई, दि. २४ : पर्यावरणमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज एमएमआर क्षेत्रातील सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या प्रगतीबाबत एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन आढावा घेतला.

बैठकीस एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, अतिरिक्त महानगर आयुक्त श्रीमती सोनिया सेठी आणि डॉ. के. एच. गोविंदराज उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी ट्रान्स हार्बर लिंक, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि मल्टी ट्रान्सपोर्ट कॉमन पाससह एमएमआर प्रदेशात सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. १ हजार २७६ कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाने ३ वर्षात बांधल्या जाणाऱ्या शिवडी – वरळी एलिव्हेटेड कनेक्टरच्या कामाच्या प्रगतीवर बैठकीत चर्चा झाली. ४ लेन कॅरिजवेसह असलेले हे एलिव्हेटेड व्हायडक्ट कनेक्टर हे शिवडी रेल्वे स्थानकाजवळील रफी अहमद किडवई रोड व आचार्य दोंदे मार्ग आरओबी आणि प्रभादेवी रेल्वे स्थानकासोबत जोडणी प्रदान करेल.

पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी मुंबई महानगर क्षेत्रासाठी एकात्मिक तिकीट प्रणाली, एमएमआर प्रदेशात कुठेही प्रवास, टोल, पार्किंग फी, किरकोळ व्यवहार इत्यादींसाठी वापरल्या जाणाऱ्या कार्ड आधारित प्रणालीच्या प्रगतीबाबत चर्चा केली. तसेच येत्या काही वर्षात मल्टी ट्रान्सपोर्ट कॉमन पासमुळे शहर व उपनगरामध्ये व्यापक सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा वापर करून मुंबईकरांसाठी प्रवासातील अडचणी दूर होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.

सध्या सुरू असलेल्या मुंबई मेट्रोच्या विविध मार्गाच्या प्रगतीचा तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावरील प्रस्तावित अॅक्सेस कंट्रोलचा आढावा घेतला. यामध्ये पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहनांची गर्दी, वेगवान कनेक्टिव्हिटी आणि एडवान्स इंटेलिजंट वाहतूक प्रणालीचा विचार करण्यात आला. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या प्रगतीचाही पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी आढावा घेतला.

मुंबई अर्बन रोप वे, मुंबई आय (लंडन आयच्या धर्तीवर), बीकेसी आर्ट डिस्ट्रिक्टची निर्मिती आणि महामुंबई पब्लिक आर्ट प्रोजेक्ट यासारख्या प्रस्तावित महत्वाकांक्षी योजनांचाही यावेळी आढावा घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button