प्रशासकीयब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

सर्वसामान्यांकरिता कोविड केअर सेंटर उपयुक्त ठरणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नागोठणे येथील कोविड केअर सेंटरचे ऑनलाईन उद्घाटन

मुंबई, दि.25 : रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी, संचालक हितलभाई मेसवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे येथील रिलायन्स इंडस्ट्रीजने भारतीय एज्युकेशन संकुलात 50 बेड मर्यादेचे उभारलेले कोविड केअर सेंटर सर्वसामान्यांच्या कोविड उपचाराकरिता उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

नागोठणे येथील भारतीय एज्युकेशन संकुलात रिलायन्स इंडस्ट्रीजने उभारलेल्या 50 बेडची  क्षमता असलेल्या कोविड केअर सेंटरच्या ई-उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री श्रीमती आदिती तटकरे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, नागोठणे रिलायन्स मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजनचे अध्यक्ष अविनाश श्रीखंडे, एचआर हेड चेतन वाळंज हे या कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थित होते. तर खासदार सुनील तटकरे, जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन, आमदार रविशेठ पाटील, आमदार अनिकेत तटकरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपविभागीय अधिकारी डॉ.यशवंत माने, जिल्हा आरोग्य डॉ.सुधाकर मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभय ससाणे तसेच नागोठणे रिलायन्स इंडस्ट्रीजचे आयआर हेड विनय किर्लोस्कर, इस्टेट हेड अजिंक्य पाटील, जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे, डॉ.उद्धव कुमार, डॉ.प्रशांत बारडोलोई हे प्रत्यक्ष उपस्थित होते.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता येथील नागरिकांना योग्य पध्दतीने कोविड आजारावर उपचार मिळण्याकरिता रिलायन्स इंडस्ट्रीजकडून आवश्यक सोयी-सुविधा, अद्ययावत वैद्यकीय सामुग्रीसह उभे केलेले हे 50 बेडचे कोविड केअर सेंटर सर्वांसाठी उपयुक्त ठरेल. कोरोनासारख्या या मोठ्या संकटात रिलायन्स, टाटा, बिर्ला यासारख्या कंपन्यांनी पुढे येऊन जी मदत केली आहे ती निश्चितच कौतुकास्पद आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, या संकटावर संघटितपणे आपण सर्वजण निश्चितपणे मात करू. शासन सर्व प्रकारे या संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रयत्नशील आहे. कोरोनाच्या संसर्गातून बऱ्या होणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे, ही दिलासादायक बाब आहे. प्रशासनाने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग जास्तीत जास्त करून सोशल डिस्टंन्सिंग, मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे या सूचनांचे पालन नागरिकांनी जास्तीत जास्त करावे, यासाठी अधिक प्रयत्न करावेत,अशी सूचनाही केली.

शेवटी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी संकटात संधी या उक्तीचा अर्थ ध्यानात घेऊन शासन आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून रायगडमध्ये रिलायन्स समूहाच्या माध्यमातून अद्ययावत चांगले रुग्णालय उभे करण्यासाठी प्रयत्न व्हावेत,असे रिलायन्स समूहाला आवाहन केले.

पालकमंत्री श्रीमती आदिती तटकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी वेळ दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. त्या पुढे म्हणाल्या की, कोरोनाच्या संकटामुळे आरोग्य यंत्रणेकडे अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण संघटितपणे खऱ्या अर्थाने हे शासन रयतेचे आहे, या उद्देशाने अहोरात्र काम करीत आहे. आधी कोरोनाचे संकट आणि त्यानंतर निसर्ग चक्रीवादळाचे संकट,अशा प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, इतर सहकारी मंत्र्यांनी रायगड जिल्ह्यासाठी केलेल्या मदतीबद्दल सर्वांचे आभार मानले.

खासदार सुनील तटकरे यांनी मनोगतात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शासनाला जनतेसाठी करीत असलेल्या कामांमध्ये यश मिळत आहे. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीजने हे कोविड केअर सेंटर उभारल्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि  महाराष्ट्र बलशाली होण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करू या, असे आवाहनही केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने नागोठणे रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष अविनाश श्रीखंडे यांनी मनोगत व्यक्त करताना रिलायन्स औद्योगिक समूह नेहमीच शासनाला मदत करण्यासाठी आघाडीवर राहील तसेच जनतेसाठी काम करणे, हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे कर्तव्य असल्याचे सांगितले.

या ई-उद्घाटन कार्यक्रमाच्या सुरुवातीस या कोविड केअर सेंटरच्या उभारणीबद्दलची लघुचित्रफीत दाखविण्यात आली, त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय एज्युकेशन विद्यासंकुलाचे संस्थापक-अध्यक्ष किशोरशेठ जैन यांनी केले तर सूत्रसंचालन नागोठणे रिलायन्स इंडस्ट्रीजचे जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे यांनी केले.  

या कोविड केअर सेंटरचा प्रामुख्याने नागोठणे येथील रिलायन्स कंपनीच्या परिसरातील दहा ग्रामपंचायतीमधील 50 गावे व आदिवासी वाड्या-वस्त्यांसाठी उपयोग होणार आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये पुरुषांसाठी 35 बेड तर महिलांसाठी 15 बेड अशा एकूण 50 बेडची व्यवस्था असणार आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शनात जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कोविड केअर सेंटर उभे केल्याबद्दल रिलायन्स समूहाचे ऋण व्यक्त करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे व अन्य लोकप्रतिनिधींचे आणि उपस्थितांचे विशेष आभार मानले. या कार्यक्रमाला नागोठणे परिसरातील सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांची उपस्थिती होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थित सर्वांनी तोंडाला मास्क लावून व सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत शासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन केले. 

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.