यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी

Last Updated by संपादक

मुंबई, दि.२५ : राज्यात यावर्षी पणन विभागाने २१९.४९  लाख क्विंटल विक्रमी कापसाची खरेदी केली आहे. गेल्या दहा वर्षातील ही विक्रमी कापूस खरेदी असल्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

यासंदर्भात माहिती देताना सहकार मंत्री श्री. पाटील म्हणाले,  राज्यात हंगाम २०१९-२० मध्ये ४४.३० लाख हेक्टर कापसाची लागवड झाली. पर्जन्यमान सामान्य झाल्यामुळे कापसाचे विक्रमी पीक झाले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कापसाच्या दरामुळे देशाअंतर्गत व राज्या अंतर्गत कापसाचे दर हे कमी होत गेले. शेतकऱ्यांना  हमी दरापेक्षा कमी दराने कापसाची विक्री करण्यांची वेळ येवू नये याकरीता राज्यात कापूस पणन महासंघाची नियुक्ती सीसीआयचे सबएजंट म्हणून करण्यांत आली.

सर्वप्रथम राज्यामध्ये ४० कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले.सातत्याने कापसाचे पडणारे दर तसेच कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव आणि वस्त्रोद्योगावर त्याच्या प्रभावामुळे  बाजारपेठेमध्ये खाजगी खरेदीदारांची  संख्या कमी होत गेली, असेही सहकार मंत्र्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना त्रास होऊ नये आणि कापूस खरेदीला विलंब होऊ नये यासाठी सीसीआय व कापूस पणन महासंघाद्वारे अधिकचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचा  निर्णय राज्य शासनाने घेतला. कापूस पणन महासंघाद्वारे परिस्थितीनुरुप १२७ कापूस खरेदी केंद्र  कोरोना पूर्वी सुरू करण्यात आली होती. कापूस पणन महासंघाकडील पुरेसा सेवक वर्ग उपलब्ध नसल्याने अधिकचे खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी आपत्कालीन परिस्थिती पाहून शासनाने कृषी विभागातील कृषी पदवीधर सेवकांची नियुक्ती  जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आली आणि नवीन कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.

हंगाम २०१९-२० मध्ये एकूण १९० कापूस खरेदी केंद्रावर कापूस पणन महासंघद्वारे कापूस खरेदीचे कामकाज सुरू आहे. कापूस पणन महासंघा द्वारे हंगाम २०१९-२० मध्ये एकूण ३. ३३ लाख शेतकऱ्यांकडून कापसाची खरेदी करण्यात आली आहे.

कोरोनाच्या  प्रादुर्भावामुळे मुळे एप्रिल महिन्यात कापसाची खरेदी  स्थगित ठेवावी  लागल्यामुळे शेतकऱ्यांची प्रतिक्षा यादी वाढत गेली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी  पावसाळ्यामध्ये देखील  मान्सून शेड उभारून कापूस खरेदी मोठ्या प्रमाणावर  करण्यात येत असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

राज्यात प्रथमच जून व जुलै महिन्यामध्ये कापसाची खरेदी करण्यात येत आहे

शेतकऱ्यांकडून एकूण ४६०० कोटी रुपयांची कापूस खरेदी करण्यात आली. बहुतांश  कापूस हा खरीप २०२०-२१ च्या पेरणी पूर्वी खरेदी करण्यात आला असून शेतकऱ्यांची देयके देखील तत्पूर्वी देण्यांत आली आहेत.

हंगाम २०१९-२० मधील  पणन महासंघद्वारे हमीभावाने केलेली खरेदी

*राज्यात हंगाम २०१९-२० करिता कापूस पिक-पेरा खालिल क्षेत्र  – ४४.३० लाख हेक्टर

*अपेक्षित कापूस उत्पादन – ४०७ लाख क्विंटल (कृषी  विभागानुसार)

*कापूस उत्पादक १०, ००० हेक्टरपेक्षा अधिकचा पेरा असलेले तालुके -१४०

*सध्यास्थितीत कापसाचे बाजार दर प्रति क्विंटल रु.३८००/४८००

*बाजारात विक्रीस येत असलेल्या कापसतील आर्द्रता ८ ते १२ टक्के

*कापूस पणन  महासंघाचे कापूस खरेदी सुरू केलेले केंद्र संख्या – ७१ तालुके – ८९ केंद्र-१९० फॅक्टरीज

*सीसीआयचे कापूस खरेदी नियोजीत केंद्र संख्या -७३ तालुके -८३ केंद्र

*महासंघाची हमी दराची कापूस खरेदी क्विंटल दि. २० जुलै.२०२० पर्यत ९०.६१ लाख  क्विंटल.

*सीसीआयची हमी दराने कापूस खरेदी क्विंटल दि.१४ जुलै २०२०१२७.४६लाख क्विंटल.

राज्यातील पिक पेरा नुसार साधारणतः होणाऱ्या कापूस उत्पादनाची व खरेदी केलेल्या कापसाची माहिती खालील प्रमाणे

1) राज्यात हंगाम  १९-२० करिता  कापूस पीक-पेरा खालील क्षेत्र – ४४.३० लाख हेक्टर

2) अपेक्षित कापूस उत्पादक – ४०७ लाख क्विंटल

3) दि. २१ जुन २०२० पर्यत खरेदी करण्यात आलेला कापूस

सीसीआय एकूण १२७.७९ लाख क्विंटल.

कापूस पणन महासंघ ९१.७०लाख क्विंटल

अशी दिनांक २४ जुलै २०२० पर्यत एकूण २१९.४९ लाख क्विंटल एवढी विक्रमी खरेदी केली आहे.

000  

काशीबाई थोरात/विसंअ

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.