राज्यात गेल्या १० वर्षातील विक्रमी कापूस खरेदी – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. २५ :  राज्यात कोरोनाची परिस्थिती तसेच पावसाला सुरुवात झालेली असून देखील पणन विभागाने राज्यात विक्रमी सुमारे दोनशे १८ लाख ७३ हजार क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. अमरावती जिल्ह्यातही खरेदी केंद्रांची संख्या वाढविणे, खरेदीसाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आदी विविध उपाययोजनांतून मोठी कापूस खरेदी झाली आहे. शेतकरी बांधवांच्या हितासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले.

राज्यात गेल्या १० वर्षात झाली नाही अशी विक्रमी कापूस खरेदी झाली आहे. या खरेदीचे एकूण मुल्य ११,७७६.८९ कोटी रुपये असून आतापर्यात ११,०२९.४७ कोटी इतकी रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे. तसेच सीसीआयने ३० सप्टेंबर २०२० पर्यंत एफएक्यू दर्जाचा कापूस खरेदी करणार असल्याचे घोषित केले आहे.

जिल्ह्यातही विविध प्रयत्नांतून कापूस खरेदीला वेग देण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कापूस खरेदीसाठी काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, त्या दूर करण्यासाठी व कापूस खरेदीला गती देण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी वेळोवेळी बैठका घेऊन निर्देश दिले. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, कृषी विभागाचे अधिकारी यांच्यासह चर्चा करून अडचणी जाणून घेतल्या. त्यानुसार काही जीन सुरु झाल्यास खरेदीला गती मिळेल. मात्र, त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता असल्याचे सांगण्यात आले. त्यात प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची संकल्पना पुढे आली. त्यानुसार जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी १० कृषी पर्यवेक्षकांच्या सेवा अधिग्रहीत केल्या.

या सर्व पर्यवेक्षकांना ग्रेडिंगबाबत प्रशिक्षण देण्यात आले. पणन महासंघाला हे प्रशिक्षित मनुष्यबळ प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आले. त्यानुसार सात आणखी जीन सुरु होऊ शकल्या. पूर्वीची १८ जीनची संख्या आता २५ वर गेली. राज्य कापूस पणन महासंघामार्फत सात केंद्रावर, तसेच सीसीआयमार्फत एक केंद्र होते. पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने सीसीआयमार्फत आणखी एक केंद्र सुरू करण्यात आले आणि कापूस खरेदीला वेग आला.

जिल्ह्यात पावणेतेरा लाख क्विंटलहून अधिक कापूस खरेदी

कोरोना संकटकाळातही जिल्ह्यात कापूस खरेदीलाही गती देण्यात आली असून, अद्यापपर्यंत ४८ हजार ७९९ शेतकरी बांधवांचा १२ लक्ष ८२ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे, अशी माहिती उपनिबंधक श्री. जाधव यांनी दिली.

जिल्ह्यातील मोर्शी व वरूड तालुकयातील शेतकऱ्यांनी केलेली कापसाची नोंदणी अधिक असल्याने वेळेत खरेदी पूर्ण होण्यासाठी या तालुक्यांसाठी आणखी दोन केंद्रे वाढविण्यात आली. मोर्शी व वरूड तालुक्यात शेतकऱ्यांनी केलेली कापसाची नोंदणी अधिक असल्यामुळे कापूस खरेदीची प्रतीक्षा यादी मोठी आहे. हे लक्षात घेऊन कापूस खरेदीची प्रक्रिया विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी राज्य पणन महासंघातर्फे वरूड तालुक्यासाठी लगतच्या नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथील ओंकार इंडस्ट्रीज येथे, तर मोर्शी तालुक्यासाठी नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथील गोपीनाथ इंडस्ट्रीज येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहितीही श्री. जाधव यांनी दिली.

राज्यात सीसीआय व राज्य कापूस पणन महासंघाने कोविड-१९ च्या प्रादूर्भावापूर्वी अनुक्रमे ९१.९० व ५४.०३ लाख क्विंटल अशी एकूण १४५.९३ क्विंटल कापूस खरेदी केली. कोविड-१९ च्या प्रादूर्भावामुळे कापसाचे बाजारातील दर हमीपेक्षा कमी असल्यामुळे, शेतकऱ्यांचा कल, शासकीय खरेदी केंद्रावर विकण्याचा होता. त्यानुसार शासकीय खरेदी नियोजन करून कोविड-१९ च्या काळात सीसीआय व कापूस पणन महासंघाने आतापर्यंत अनुक्रमे ३५.७० व ३६.७५ लाख याप्रमाणे ७२.४५ लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे. राज्यातील शासकीय व खासगी अशी एकूण खरेदी ४१८.८ लाख क्विंटल झाली असून वास्तविक पहाता ४१० लाख क्विंटल कापूस खरेदी अपेक्षित होती. एकूण ८ लाख ६४ हजार ७२ शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्यात आला.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.