प्रशासकीयब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

महाराष्ट्रात यावर्षी मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी; हे कापूस उत्पादकांना न्याय देणारे वर्ष : पालकमंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपूर, दि. २५ जुलै : जिल्ह्यामध्ये धान (भात) पिकाबरोबरच कापूस पीक देखील घेण्यात येते. आतापर्यंत जिल्ह्यातून १ लाख ६३ हजार ६१६ शेतकऱ्यांकडून ३० लाख ४४ हजार २२६ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात यावर्षी सर्वाधिक खरेदी झाली आहे. जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या खरेदीमुळे न्याय मिळाला असून हे वर्ष कापूस उत्पादकांना न्याय देणारे वर्ष ठरले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

खरिपामध्ये धान उत्पादकांना गोसीखुर्द वरून आणखी पाणी मिळावे, गोसीखुर्दच्या पाण्याच्या वितरणातून चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकाधिक भागामध्ये सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी, हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने जिल्ह्यात सुरु व्हावा, यासाठी त्यांनी नुकतीच नागपूर येथे बैठक घेतली. यावेळी त्यांनी वर्धा नदीच्या काठावर विस्तीर्ण प्रदेशात कापूस उत्पादकांची मोठ्या प्रमाणात संख्या असून या उत्पादकांना देखील सिंचनाचा कसा फायदा होईल, यासंदर्भात लवकरच आढावा घेतला असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना त्यांनी या वर्षी कापूस खरेदी संदर्भात जिल्हा प्रशासनाने एप्रिल, मे व जून महिन्यामध्ये केलेल्या पाठपुराव्याचे देखील कौतुक केले. जिनिंग मालकांनी काही ठिकाणी उत्तम सहकार्य केल्याचेही त्यांनी सांगितले. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पुढील काळात देखील कोणत्याच प्रकारची अडचण येणार नाही. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे ते म्हणाले. जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस तात्काळ खरेदी करता यावा यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनात विविध बैठका घेण्यात आल्या. गरज पडली तेव्हा अन्य राज्यातून ग्रेडर आणले गेले. याचा फायदा होत शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी सुरू झाली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी करावी असे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले होते. तसेच कापूस खरेदी संदर्भात जिनिंग-प्रेसिंग मालकांना निर्देश देण्यात आले होते. जिल्ह्यात कापूस खरेदीसाठी 36 कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली होती. या कापूस खरेदी केंद्राद्वारे शासकीय हमीभावाने कापूस खरेदी करण्यात येत आहे.

राज्यात कोरोनाची परिस्थिती तसेच पावसाला सुरुवात झालेली असून देखील पणन विभागाने विक्रमी २१८.७३ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. गेल्या १० वर्षात झाली नाही अशी विक्रमी खरेदी या वर्षी झाली आहे. या खरेदीचे एकूण मुल्य ११,७७६.८९ कोटी रुपये असून आतापर्यात ११,०२९.४७ कोटी इतकी रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे. तसेच सीसीआय ने ३० सप्टेंबर २०२० पर्यंत एफएक्यू दर्जाचा कापूस खरेदी करणार असल्याचे घोषित केले आहे. राज्यात सीसीआय व राज्य कापूस पणन महासंघाने कोविड-१९ च्या प्रादूर्भावापूर्वी अनुक्रमे ९१.९० व ५४.०३ लाख क्विंटल कापूस खरेदी अशा प्रकारे एकूण १४५.९३ क्विंटल कापूस खरेदी केली.

कोविड-१९ च्या प्रादूर्भावामुळे कापसाचे बाजारातील दर हमीपेक्षा कमी असल्यामुळे, शेतकऱ्यांचा कल, शासकीय खरेदी केंद्रावर विकण्याचा होता. त्यानुसार शासकीय खरेदी नियोजन करून कोविड-१९ च्या काळात सीसीआय व कापूस पणन महासंघाने आजपर्यंत अनुक्रमे ३५.७० व ३६.७५ लाख याप्रमाणे ७२.४५ लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे.

राज्यातील शासकीय व खासगी अशी एकूण खरेदी ४१८.८ लाख क्विंटल झाली असून वास्तविक पहाता ४१० लाख क्विंटल कापूस खरेदी अपेक्षित होती. एकूण ८ लाख ६४ हजार ७२ शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत सीसीआयमार्फत ४ लाख ३१ हजार ८८५  क्विंटल कापसाची खरेदी केली तर राज्य कापूस पणन महासंघाने  २ लाख १० हजार १३७ क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. थेट पणन परवानाधारकामार्फत ४ लाख ८२ हजार ७०० क्विंटल तसेच बाजार समिती परवानाधारक यांच्यामार्फत १९ लाख १९ हजार ५०३ क्विंटल कापसाची खरेदी केली आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.