कोरोना प्रतिबंधासाठी दक्षतेच्या प्रत्येक नियमाचे काटेकोर पालन आवश्यक – ॲड.यशोमती ठाकूर

Last Updated by संपादक

अमरावती, दि.२६:आठवडा विशेष टीम― कोरोनाची जोखीम सर्वांना समान आहे. कोरोना प्रतिबंधासाठी दक्षतेच्या प्रत्येक नियमाचे प्रत्येकाकडून काटेकोर पालन होणे आवश्यक आहे, असे सांगत पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी मुंबईहून परतताच स्वतःसह सर्वांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करून घेतली. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्यावरच त्या निवासस्थानी परतल्या.

कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर सातत्याने प्रयत्नशील आहेत. अमरावती येथे स्थानिक स्तरावर स्वतंत्र प्रयोगशाळा, जिल्हा कोविड रुग्णालयासह विविध आरोग्य यंत्रणा आदींचे सक्षमीकरण विविध सुविधांत वाढ यासह लोकजागृतीसाठी त्या सातत्याने प्रयत्न व आवाहन करत आहेत.

शासकीय कामानिमित्त पालकमंत्री श्रीमती ठाकूर मुंबई येथे गेल्या होत्या, तेथून त्या परवा रात्री परतल्या. रात्री उशिरा परतल्यावरही त्यांनी थेट घरी न जाता सुरक्षितता लक्षात घेऊन दक्षतेच्या नियमांचे पालन करून अँटिजेन टेस्ट करण्यासाठी कुठल्याही खासगी रुग्णालयात न जाता त्यांनी शासकीय रुग्णालय गाठले. यावेळी पालकमंत्री महोदयांसह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची टेस्ट करण्यात आली. अहवाल प्राप्त होईपर्यंत त्या रुग्णालयातच थांबून होत्या. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्यावरच पालकमंत्र्यांनी स्वतःच्या निवासस्थानी पाऊल ठेवले.

पालकमंत्री यांचे ओएसडी प्रमोद कापडे, सतीश गवई, अमोल साबळे, सहकारी श्याम देशमुख, स्वप्नील देशमुख, शैलेश मनवर, सागर हांडे आदींचीही चाचणी या वेळी करण्यात आली या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोरोनाची जोखीम सर्वांना समान आहे त्यामुळे कोरोना प्रतिबंधासाठी दक्षतेच्या प्रत्येक नियमाचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. कोरोना प्रतिबंधासाठी शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनीही दक्षतेच्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी केले.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांना गती देताना चाचण्यांची संख्या वाढवणे, वेळीच योग्य उपचार देणे व मृत्यू दर शून्यावर आणणे हे उद्दिष्ट्य शासनाने डोळ्यासमोर ठेवले आहे. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही सुविधा झपाट्याने वाढवणे आणि कोणत्याही परिस्थितीत गाफील न राहता मोठ्या प्रमाणावर तपासण्या करून मृत्यू दर शून्यावर आणणे हे उद्दिष्ट्य आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात टास्क फोर्सही स्थापन करण्यात आले आहेत.

कोरोनाविरूद्धच्या या लढाईत शासकीय प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स, नियमित स्वच्छता यांचे पालन करण्यासह कुठलीही लक्षणे आढळताच तपासणी करून घेणे आवश्यक आहे. सर्वांनी दक्षता पाहून नियंत्रणासाठी सहकार्य करावे, असे कळकळीचे आवाहन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.