प्रशासकीयब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

वेळेत चाचणी करून उपचार घेतल्यास मृत्यूदरात घट

केंद्रीय पथकाने घेतला कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या आढावा

जळगाव.दि.26:आठवडा विशेष टीम― कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसताच स्वत: कोविड हॉस्पिटलमध्ये जाऊन कोरोनाची चाचणी करून घेऊन तात्काळ इलाज करून घेतल्यास मृत्यूदर नक्कीच कमी होऊ शकेल असा विश्वास व्यक्त करतानाच आरोग्य प्रशासनानेही चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना केंद्रीय सहसचिव कुणाल कुमार यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास नियुक्त जिल्हास्तरीय बैठक श्री.कुणाल कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी समिती सदस्य डॉ.अरविंद कुशवाह,डॉ. सितीकांता बॅनर्जी,जिल्हाधिकारी अभिजित राऊत,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील,पोलीस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले,महानगर पालिकेचे आयुक्त सतिष कुलकर्णी, आदी अधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी कुणाल कुमार यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजना आणि येत असलेल्या अडचणी तसेच रुग्णवाहिका व्यवस्थापन, खाटांची उपलब्धता, प्रतिबंधित क्षेत्रातील उपाययोजना, मनुष्यबळ व निधीबाबतची माहिती जाणून घेतली. ते म्हणाले की, कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लोकांच्या मनातील या आजाराविषयीची भिती दूर करणे आवश्यक आहे. यासाठी जनजनगृती करण्याबरोबरच संवाद आणि समन्वय आवश्यक आहे. एखादा व्यक्ती तपासणीत पॉझीटिव्ह आढळून आल्यास त्याला तात्काळ उपचार मिळणेही तितकेच महत्वाचे आहे. यासाठी व्यवस्थापन पध्दत सतत अदयावत ठेवणे आवश्यक आहे. प्रतिबंधित क्षेत्राकडे विशेष लक्ष देऊन तेथील रुग्णसंख्या कमी करण्याबरोबरच त्या क्षेत्रातील नागरिकांच्या मुलभूत गरजांकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी व ती कायम नियंत्रणात राहण्यासाठी विशेष दक्षता घेण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्यात. कोरोना विरुध्दच्या या लढाईत सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी समन्वयाने काम करावे असेही त्यांनी सूचित केले.

प्रारंभी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हयातील कोरोनाबाबतची एकंदरीत स्थिती. व त्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपायोजना व त्यातून मिळालेले यश याची सविस्तरपणे माहिती सादर केली.महापालिका प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती व मिळालेले यश महानगर पालिकेचे आयुक्त सतिष कुलकर्णी यांनी ग्राफिकच्या माध्यमातून सादर केली. केंद्रीय सहसचिव कुणाल कुमार यांनी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेकडून कारोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांवर समाधान व्यक्त करून अजून अधिक जोमाने व समन्वाने काम करण्याच्या अपेक्षा व्यक्त केली.

प्रतिबंधित क्षेत्रास भेटी

केंद्रीय पथकाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने आयोजित जिल्हास्तरीय आढावा बैठकीपूर्वी शहरातील कार्तीक नगर,शिवाजी नगर येथील प्रतिबंधात्मक क्षेत्रांची पाहणी केली तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड हॉस्पिटलला भेट दिली व तेथील रुग्णांची पाहणी करून औषधोपचाराची माहिती जाणून घेतली पाहणीनंतर पथकाने जिल्हा प्रशासनाकडून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोनांबाबत संबंधित यंत्रणांना सूचना केल्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button