चंद्रपूर, दि. 27 जुलै:आठवडा विशेष टीम― कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आयुष उपक्रमाची जनजागृती तसेच नागरिकांच्या मानसिक समस्या सोडविण्यासाठी सहयोगी मानसिक आरोग्य हेल्पलाईन 155-398 सुरु करण्यात आलेली आहे. आयुष उपक्रमांच्या जनजागृती विषयक साहित्यांचे अर्थात पोस्टर, पत्रके, घडीपुस्तीकांचे विमोचन तसेच सहयोगी मानसिक आरोग्य हेल्पलाईनचे पोस्टर, पत्रके, घडीपुस्तीकांचे विमोचन राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी आयुष उपक्रमाविषयीची सविस्तर माहिती सांगितली. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी नागरिकांमधील रोग प्रतिकारशक्ती वाढवणे हा उपाय आहे. यासाठी आयुष मंत्रालय भारत सरकार व आयुष विभाग महाराष्ट्र शासनाने आयुष चिकित्सापद्धतीचे उपाय सुचविले आहेत.आयुष उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी राज्यात सर्वप्रथम चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व अलगीकरण केंद्रात आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथी औषधाचे तसेच आयुष काढ्याचे वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यातील नागरिकांमध्ये आयुष उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जनजागृती संदर्भात पोस्टर, बॅनर, पत्रके, स्टीकर्स तयार केलेले आहेत.
जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनात कोरोना जनजागृतीसाठी आत्मभान अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत नागरिकांना मानसिक आधारासाठी हॅलो चांदा 155-398 हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईनच्या प्रसिद्धीसाठी फलके, पत्रके, स्टिकर्स तयार केले आहेत. सहयोगी मानसिक आरोग्य संदर्भातील हेल्पलाईनमध्ये जिल्हा प्रशासनासोबत सुशिलाबाई रामचंद्रराव मामिडवार कॉलेज ऑफ सोशल वर्कचे प्राचार्य डॉ.सुनील साकुरे, प्राध्यापिका डॉ.जयश्री कापसे, प्राध्यापक डॉ.देवेंद्र बोरकुटे यांची प्रशिक्षित समुपदेशकांची चमू काम बघणार आहे. यावेळी हेल्पलाईन विषयीची माहिती प्राध्यापिका डॉ.जयश्री कापसे यांनी विषद केली.
जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या उपाययोजना व पुढील नियोजना संदर्भातील घडीपुस्तिकेचे सुद्धा यावेळी पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. या घडी पुस्तिकेमध्ये उपाययोजना आणि बाधितांची सेवा, स्थलांतरितांचे अवागमन, अन्नधान्य पुरवठा, आत्मभान व जनजागृती, निधी वितरण व संकलन, निवारा गृह व अन्नछत्र इत्यादी विषयी सविस्तर माहिती दिली आहे. या विषयीची माहिती जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी सादर केली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले,आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, जिल्हा आयुष अधिकारी डॉ.गजानन राऊत, सुशिलाबाई रामचंद्रराव मामिडवार कॉलेज ऑफ सोशल वर्कचे प्राचार्य डॉ.सुनील साकुरे, प्राध्यापिका डॉ.जयश्री कापसे प्रामुख्याने उपस्थित होते.