प्रशासकीयब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

नागपूर: शेतकऱ्यांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करा – सुनील केदार

नागपूर, दि. 27 :आठवडा विशेष टीम― जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी लवकर पेरणी झाली आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यातील बँकांनी शेतक-यांना पीककर्ज वाटप पूर्ण केले नसून, त्‍यांना ते तात्काळ उपलब्ध करुन देण्याचे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी बँकांच्या वरिष्ठ अधिका-यांना दिलेत.

विभागीय आयुक्त कार्यालयात वर्धा जिल्ह्यातील शेतक-यांच्या पीककर्ज व पीकविमा आढावा बैठकीत ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे व विविध बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आतापर्यंत दिलेल्या उद्द्ष्टिानुसार बँकांनी शेतक-यांना पीककर्ज वाटप केले नसल्यामुळे पालकमंत्री केदार यांनी नाराजी व्यक्त करत, पीककर्ज वाटपाची प्रक्रिया गतिमान करण्याचे सांगून, प्रलंबित अर्जांवर तात्काळ कार्यवाही करुन जास्तीत-जास्त पात्र शेतक-यांना पीककर्ज उपलब्ध करुन देण्याच्या सूचना केल्या. तसेच पीककर्जासाठी अपात्र ठरलेल्या शेतक-यांच्या शाखानिहाय याद्या तात्काळ उपलब्ध करुन देत त्याची कारणे स्पष्ट करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

प्रधानमंत्री पीकविमा काढण्यासाठी शेतक-यांचे प्रबोधन करावे. येत्या सोमवारी पीककर्ज आणि पीकविम्याचा आढावा जाणार आहे. जिल्ह्यात अचानक नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास पिकांचे प्रचंड नुकसान होईल. परिणामी पुन्हा राज्य शासनालाच शेतक-यांना मदत करावी लागेल. त्यामुळे बँकांनी 31 जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पीकविमा काढण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे निर्देश दिले.

शेतकऱ्यांना पीककर्ज व पीकविमा काढण्यासाठी ग्रामीण भागात तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी आणि सखी यांची नोडल एजन्सी नेमली असून बँकांनी त्यांच्यासोबत समन्वय साधत लक्ष्य पूर्ण करावे. तसेच बँकांनी पात्र व अपात्र शेतक-यांची यादीही देण्याचे निर्देश दिले. आतापर्यंत जिल्ह्यातील एकाही बँकेने पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण न केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.

शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपामध्ये अडचणी येत असल्यास बँक अधिका-यांनी थेट जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्याशी संपर्क साधण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. केदार यांनी दिले.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.