अमरावती, दि. 27:आठवडा विशेष टीम― कोरोनाच्या संकटकाळात राज्यातील शाळा व महाविद्यालये सुरु करण्यासाठी सध्यातरी राज्यस्तरावर कुठलाही शासन निर्णय झाला नाही. परंतू, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व शासकीय, खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत,असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी शिक्षण विभागाला दिले.
श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, शिक्षण विभागाने विद्यार्थीनिहाय शाळांची यादी तयार करुन संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यासाठी सूचना द्याव्यात. इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांचे कोचिंग क्लासेस बंद आहेत, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जोपासण्यासाठी सर्वकष प्रयत्न करावेत. विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन किंवा इतर ऑनलाईन सुविधा नसतात किंवा ते खरेदी करण्याची त्यांची ऐपतही नसते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्थानिक केबल किंवा दुरदर्शनवर एखादी मालिका तयार करुन दाखविणे सोईचे करता येईल, अशा पध्दतीने शिक्षण विभागाने प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांच्या पालकांशी प्रत्यक्ष संपर्क साधून अभ्यासक्रमाची पुस्तके, वह्या त्यांना प्राप्त झाली किंवा नाही तसेच पाल्याच्या शिक्षणाविषयी त्यांचीशी विचार विनिमय करावा, असेही श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
सध्या जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना ‘शिक्षक मित्र’ या कार्यक्रमाव्दारे शिक्षण देण्यात येत आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांनी यावेळी दिली.