जिल्ह्यात युरिया पुरेशा प्रमाणात उपलब्ध
अमरावती, दि. २७ : जिल्ह्यात युरियाचा चढ्या भावात विक्री व टंचाई या संदर्भात तक्रारी होत आहेत. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुमारे ४ हजार मेट्रीक टन युरिया उपलब्ध होणार आहे. शेतीशी निगडीत बियाणे व युरिया संदर्भातील तक्रारींचे तत्काळ निवाकरण करण्यासाठी कृषी विभागाने प्राधान्याने प्रयत्न करावेत, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत दिले.
यावेळी महापौर चेतन गांवडे, आमदार प्रताप अडसळ, आमदार राजकुमार पटेल, आमदार सुलभाताई खोडके, जि.प.अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस आयुक्त संजय बावीस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, जिल्हा कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांचेसह कृषी विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्ह्यात बडनेरा व धामनगाव रेल्वे या दोनच ठिकाणी युरीया रॅक उतरविण्याची सुविधा आहे. युरिया बॅगची 266.50 रुपये कपंनी किंमत असतांना चढ्या भावाने युरीया विक्री होत आहे. यावर अंकूश लावण्यासाठी कृषी विभागाने तपासणी पथकाव्दारे जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्राची पाहणी करावी. ज्या ठिकाणी असे घडत असेल त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
केंद्र सरकारला 45 हजार मे. टन जिल्ह्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. माहे सप्टेंबर पर्यंत 33 हजार मे.टन युरीया जिल्ह्याला मंजूर झाला आहे. माहे जुलै पर्यंत 22 हजार मे. टन युरीयापैकी 17 हजार मे. टन युरीया जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला वितरीत करण्यात आला आहे. कमी पैश्यात उपलब्ध होणारे खत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून युरीयाची मागणी अधिक आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी 4 हजार मे. टनच्या बॅग्स 27 जुलै, 29 जुलै व 1 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी बैठकीत दिली.
बचतगटांच्या माध्यमातून खते व बि बियाणे विक्रीसाठी त्यांना प्रोत्साहित करावे. आवश्यक कागदपत्रे निकष पूर्ण करुन बचतगटांच्या माध्यमातून खते, बि बीयाणे विक्री करण्यात यावी, अशा सूचना श्रीमती ठाकूर यांनी कृषी विभागाला केल्या.
बोगस बीयाणे संदर्भात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने तत्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी. महाबीजला 1 हजार 136 शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाली असून नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती संबंधितांनी यावेळी दिली. केंद्र सरकारच्या कंपनीकडून राज्याला युरीया प्राप्त होत असतांना, तसेच सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतांना कृषी केंद्राच्या मालकांवर गुन्हे दाखल होणे, हे अतिशय वाईट बाब आहे. यासंदर्भात केंद्र सरकारच्या यंत्रणेशी पाठपुरावा करुन तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, अश्या सूचना श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिल्या