सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी केले प्लाझ्मा दानचे आवाहन
कोल्हापूर, दि. 27:आठवडा विशेष टीम―कोरोना संसर्गावर मात करुन जे संसर्गमुक्त झाले आहेत, असे दाते पुढे येवून प्लाझ्मा दान करत आहेत. ही जिल्ह्यासाठी चांगली बाब आहे. हा प्लाझ्मा कोरोना अत्यवस्थ रुग्णांसाठी जीवनदान ठरेल, त्यासाठी संसर्गमुक्त झालेल्यांनी अधिकाधिक पुढे येवून प्लाझ्मा दान करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज येथील सीपीआरमध्ये प्लाझ्मा दान शिबिर घेण्यात आले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या प्लाझ्मा दान आवाहनास जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकूण 30 दात्यांनी 60 युनिट प्लाझ्मा दान केला आहे. अत्यवस्थ रुग्णांसाठी याचा उपयोग होणार आहे. ही जिल्ह्याच्या दृष्टीने चांगली बाब आहे. अजूनही संसर्गमुक्त झालेल्यांनी पुढे येवून प्लाझ्मा दान करावा, असेही श्री. यड्रावकर यावेळी म्हणाले. यावेळी शिबिरातील प्लाझ्मा दात्यांना राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
डॉ. शीतल यादव यांनी यावेळी प्लाझ्मा दान विषयी राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांना सविस्तर माहिती दिली. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक बी.सी.केम्पीपाटील, मेडीसीन विभाग प्रमुख डॉ. महेंद्र बनसोडे, हिमॅटॉलॉजिस्ट डॉ. वरुण बाफणा, तंत्रज्ञ प्रमुख रंजन पाटील, रमेश सावंत, डॉ. रामटेके आदी उपस्थित होते.