वनमंत्री संजय राठोड यांची माहिती
मुंबई दि.२७:आठवडा विशेष टीम―
मानव व बिबट्या सहसंबंध अधिक समजून घेण्यासाठी बिबट्याच्या टेलिमेट्रि (दूरमिती ) अभ्यासाला भारत सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय, नवी दिल्ली यांची नुकतीच मान्यता मिळाली असून वन विभाग, महाराष्ट्र शासन व वाईल्ड लाईफ कंझर्वेशन सोसायटी-इंडिया संयुक्तपणे हा अभ्यास करणार आहेत व पुढील दोन वर्षात त्याचे निष्कर्ष हाती येतील अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.
या प्रकल्पांतर्गत शहरी भागाच्या आसपास वावर करणार्या पाच बिबट्यांना कॉलर जीपीएस व जीएसएम लावले जाणार असून त्यानंतर बिबट्याचा दोन वर्ष अभ्यास केला जाणार आहे. या अभ्यास प्रकल्पासाठी 62 लाख रुपये खर्च येणार आहे.त्यापैकी 40 लाख रुपये वन विभाग तर 22 लाख रुपये वाईल्ड लाईफ कंझर्वेशन सोसायटी-इंडिया यांचेकडून उपलब्ध करून दिले जाणार आहेत .
या अभ्यासातून बिबट्याचा प्रसार, अधिवास व आवास क्षेत्र समजून घेण्यास मदत होणार आहे. मानव आणि बिबट्या यांचे परस्पर संबंध कसे निर्माण होतात तसेच बिबटे हे मानवी जीवनासोबत कसे जुळवून घेतात याचा अभ्यास यात केला जाणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील बिबटे तेथील जागेचा वापर कसा करतात तसेच त्यांचे भ्रमण कसे होते याबाबत या अभ्यासातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला जाणार आहे व अभ्यासातील निष्कर्षांच्या आधारे बिबट्या व मानव यांच्यातील संघर्ष कसा कमी करता येईल याबाबतही या प्रकल्प अभ्यासातून माहिती, निष्कर्ष उपलब्ध होणार असून उपाययोजना सुचविल्या जाणार असल्याची माहिती वनमंत्र्यांनी दिली .
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व आजूबाजूचा परिसर या अनुषंगाने होणाऱ्या या अभ्यास प्रकल्पावर वन विभागामार्फत अप्पर प्रधान वनसंरक्षक सुनील लिमये व वाईल्ड लाईफ कंझर्वेशन सोसायटी-इंडिया मार्फत डॉ. विद्या अत्रेय या मार्गदर्शन व कामकाज पाहणार आहेत. डॉ. विद्या अत्रेय यांनी यापूर्वी मानव व बिबट्या संबंध व संघर्ष या बाबत अनेक प्रकारचे संशोधन केले असून हा प्रकल्प पूर्ण करताना त्यांच्या ज्ञानाचा निश्चितच फायदा होईल असा विश्वास वनमंत्री श्री. राठोड यांनी व्यक्त केला.