शाळा बंद…पण शिक्षण आहे ;सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध उपक्रम

मुंबई दि. 28:आठवडा विशेष टीम―

राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्या तरी शालेय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु राहण्यासाठी विविध माध्यमांमधून प्रयत्न केले जात आहेत. ज्या शिक्षकांना कोरोना ड्युटी आहे त्या शाळांमधील मुख्याध्यापकांनी पर्यायी शिक्षकांची व्यवस्था उपलब्ध करणे, एकावेळी शाळेतील सर्वच शिक्षकांना ड्युटी न लावता शिक्षक उपलब्ध करुन देण्याच्या स्पष्ट सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

प्रसिद्धी माध्यमातून सरकारी शाळांमधील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत अशा आशयाचे वृत्त प्रसारित होत आहे. या वृत्तामध्ये तथ्य नसून यासंदर्भात वस्तुस्थितीदर्शक सविस्तर खुलासा शालेय शिक्षण विभागाच्या मार्फत करण्यात आला आहे.

शाळा बंद पण शिक्षण आहे…

• शाळा बंद .. पण शिक्षण आहे .. या अभ्यासमालेच्या सहाय्याने दीक्षा APP आधारित विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययन करण्यासाठीचा उपक्रम गेले ३ महिने सलग सुरु आहे.

• विद्यार्थ्यांसाठी स्वयंशिक्षणासाठी पर्यायी शैक्षणिक दिनदर्शिका विकसित करण्यात आली आहे.

• जिओ टी.व्ही वर चार माध्यमांमधून विद्यार्थ्यांसाठी इ. ३ री ते इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित करण्यात येत आहेत.

• जिओ सावन या रेडीओ वाहिनीवर देखील कार्यक्रम प्रसारित करण्यात येत आहेत.

• पाठ्यपुस्तके १००% विद्यार्थ्यांना पोहोच करण्यात आली आहेत.

• यु ट्यूब वाहिनीवर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे व्हिडीओ चे Channel सुरु करून त्यावर व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.

• DD सह्याद्री वाहिनीवर टीलीमिली हा शैक्षणिक कार्यक्रम इ.१ ली ते इ.८ वी साठी सुरु करण्यात आला आहे.

• शिक्षकांना घरातून विद्यार्थ्यांना अध्यापन करता यावे यासाठी गूगल क्लासरूमची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

• स्वयंसेवक, शिक्षक वाडी वस्त्यांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत.

शाळा बंद…पण शिक्षण सुरु रहावे यासाठी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती, शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.