पीक कर्ज वितरणासाठी विशेष अभियान राबवा – दादाजी भुसे

धुळे, दि. 28:आठवडा विशेष टीम―महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत धुळे जिल्ह्यातील 40 हजार 964 शेतकऱ्यांना 307 कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे. त्या तुलनेत पीक कर्जाचे वितरण कमी आहे. त्यामुळे अग्रणी बँक, जिल्हा उपनिबंधक यांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरणासाठी विशेष मोहीम राबवावी, असे निर्देश राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत.

मंत्री श्री. भुसे आज धुळे जिल्हा दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी विटाई, बेहेड ता. साक्री येथील शेतकऱ्यांशी तसेच लोणखेडी, ता. जि. धुळे येथे शेती शाळेत सहभागी महिलांशी संवाद साधला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार मंजुळाताई गावित, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रामकृष्ण खलाणे, जिल्हाधिकारी संजय यादव, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मनोजकुमार दास, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी पी. एम. सोनवणे आदींसह विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. भुसे म्हणाले, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या तुलनेत धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जाचा झालेला पुरवठा कमी आहे. या पार्श्वभूमीवर विशेष अभियान राबवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ मिळवून द्यावा. जेणेकरून शेतकरी उत्पादन वाढवू शकतील आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी पीक कर्ज वितरणाचा दर तीन दिवसांनी आढावा घ्यावा.

धुळे जिल्ह्यास रासायनिक खतांचा पुरेसा साठा येत्या आठ दिवसांत उपलब्ध करून देतानाच प्रत्येक शेतकऱ्याला रासायनिक खते मिळतील, असे नियोजन करावे. पीक पध्दतीनुसार शेतकऱ्यांना आवश्यक रासायनिक खते उपलब्ध करून द्यावीत, असेही त्यांनी सांगितले. कोरोना विषाणूच्या सद्य:स्थितीचा मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी आढावा घेतला. त्यांनी सांगितले, की कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेगवेगळ्या भागातील वैद्यकीय व्यावसायिकांचे सक्षमीकरण करून त्यांची मदत घ्यावी. त्यांच्या मदतीने नागरिकांचे आरोग्य तपासणीसाठी शिबिर घ्यावे, अशीही सूचना त्यांनी दिली.

जिल्हाधिकारी श्री. यादव, महानगरपालिकेचे आयुक्त श्री. शेख यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सुरू असलेल्या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सोनवणे, जिल्हा उपनिबंधक डॉ. शिंदे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. दास, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चौधरी यांनी आपापल्या विभागांची माहिती दिली.

मका पीक प्रात्यक्षिकाची पाहणी

तत्पूर्वी मंत्री श्री. भुसे यांनी विटाई, ता. साक्री येथे धनराज गजमल खैरनार यांच्या शेताला भेट देऊन राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत मका पीक प्रात्यक्षिकाची पाहणी केली. त्यानंतर डाळिंब बागेची पाहणी करून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. यावेळी आमदार मंजुळाताई गावित, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सोनवणे, तहसीलदार प्रवीण चव्हाणके, साक्रीचे तालुका कृषी अधिकारी सी. के. ठाकरे, पंचायत समितीचे सदस्य राजधर देसले, विटाईचे सरपंच भीमराव खैरनार, कासारेचे सरपंच विशाल देसले आदी उपस्थित होते. त्यानंतर बेहेड ता. साक्री शिवारात गवार आणि तूर पिकांचे आंतरपीक घेतलेल्या शेतकऱ्याच्या शेतात जावून त्यांच्याशी मंत्री श्री. भुसे यांनी संवाद साधला. गवारची बाजारपेठ, उत्पन्न, लागवड याविषयी त्यांनी संवाद साधला. याशिवाय मंत्री श्री. भुसे यांनी नांदवण, ता. साक्री येथील दाळ मिलला भेट देवून पाहणी केली.

शेतीशाळेतील ज्ञान अन्य महिला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

कृषिमंत्री श्री. भुसे यांनी लोणखेडी, ता. जि. धुळे येथे पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) अंतर्गत सुरू असलेल्या शेतीशाळेस भेट देऊन मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले, शेती शाळेत मिळालेले ज्ञान आपल्या परिसरातील अन्य महिला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. त्यामुळे शेतीच्या उत्पादन खर्चात बचत होण्यास मदत होईल. यावेळी उपस्थित महिला शेतकऱ्यांना मंत्री श्री. भुसे, आमदार श्रीमती गावित, सामाजिक कार्यकर्ते हिलाल माळी यांच्या हस्ते शेतकरी कीटचे वितरण करण्यात आले. सीमा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मंडळ कृषी अधिकारी अमृत पवार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

तलाठी कार्यालयास भेट

कृषिमंत्री श्री. भुसे लोणखेडी येथे शेतीशाळेस भेट देण्यासाठी जात असताना रस्त्यात लोणखेडी येथील तलाठी कार्यालयासमोर त्यांना ग्रामस्थांची गर्दी दिसली. त्यांनी तेथे जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. तसेच जिल्हाधिकारी श्री. यादव यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधत लोणखेडी येथे अधिकच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश दिले. तसेच नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमितपणे मास्क वापरावा. दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे. साबण व सॅनेटायझरने नियमितपणे हात स्वच्छ धुवावेत, असेही आवाहन ग्रामस्थांना केले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.