रक्षाबंधनाला चंद्रपूर जिल्ह्यातील आशा वर्कर्सना सन्मानित करणार

Last Updated by संपादक

चंद्रपूर, दि.28:आठवडा विशेष टीम― चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्ग काळात गावागावात फिरून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आशा वर्कर यांचा कार्याचा एक भाऊ म्हणून मला अभिमान आहे. त्यामुळेच प्रशासनातर्फे रक्षाबंधनाच्या पर्वावर या कामाचे कौतुक म्हणून अकराशे रुपये रोख व साडी-चोळी देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे मदत पुनर्वसनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

चंद्रपूर जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौर्‍यात सायंकाळी पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांनी ही माहिती दिली. गावागावांमध्ये घराघरात पोहोचून प्रशासनाला आरोग्यविषयक माहिती गोळा करून देण्यासाठी कोरोना सारख्या जोखमीच्या काळात आशाताईंनी अतिशय समर्पणाच्या भावनेतून काम केले आहे. या कामाची नोंद आणि या कामातूनच आजच्या दिवसापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना आजाराचा प्रसार मर्यादित राहिला आहे. जिल्ह्यात अद्याप एकही बाधित मृत्युमुखी पडलेल्या नाही. आरोग्य यंत्रणेच्या यशामध्ये आशाताईंचे श्रम विसरता कामा नये ,असेही त्यांनी सांगितले.

या महिन्यात रक्षाबंधनाचा भावा-बहिणीचा सण असून या पवित्र सणावर प्रत्येक आशा वर्करला सन्मानित करण्याचे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून निश्चित केले असून 3 ऑगस्टला यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमांमध्ये प्रातिनिधिक स्वरूपात जिल्ह्यातील आशा वर्कर यांना सन्मानित करण्यात येईल.

यावेळी त्यांनी जिल्ह्यातून जवळपास 65 हजार अन्य राज्यातील कामगार आपापल्या राज्यात गेले असल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यात असलेल्या उद्योग व्यवसायामध्ये अशावेळी कौशल्यपूर्ण कामगारांची गरज भासत आहे. याशिवाय वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या खाणींमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कामगारांची आवश्यकता आहे. काही कामे कौशल्याची आहे. त्यामुळे अशा ठिकाणी महिनाभराचे प्रशिक्षण देऊन स्थानिक कामगारांना, सुशिक्षित बेरोजगारांना, भरती करण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. आज यासाठी त्यांनी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या सर्व खाणींच्या व्यवस्थापकांची बैठक घेतली होती.

आजच्या अन्य एका बैठकीमध्ये त्यांनी माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या उपस्थित वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. वन्यजीव व मानव संघर्षावर यामध्ये चर्चा झाली. तसेच शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासा बाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या बैठकीसाठी पाचारण करण्यात आले होते. वन मंत्र्यांसोबत या संदर्भात आणखी एक बैठक घेऊन निर्णय घेण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

भाताची रोवनी जिल्ह्यामध्ये जवळपास पन्नास टक्‍क्‍यांपर्यंत पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना युरिया कमी पडणार नाही. युरिया भेटत नसल्याबाबतच्या बातम्या या कृत्रिम टंचाईतून पुढे आल्या असून त्याचा शोध घेतला जात आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात युरियाची खेप पोहोचेल असे सांगितले.

दुपारच्या सत्रामध्ये विविध विभागाच्या वार्षिक योजना संदर्भात जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक झाल्याचे सांगितले. कोरोना संक्रमण काळामध्ये काटेकोरपणे प्रत्येकाने आपल्या कार्यालयाचे आर्थिक नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

महिला विकास महामंडळाच्या अनेक उपक्रमांना देखील त्यांनी सुरुवात केली असल्याचे शेवटी पत्रकार परिषदेत सांगितले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.