प्रशासकीयब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्य

ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना मिळणार ५०० नवीन रुग्णवाहिका

अर्थसंकल्पातील घोषणेची पूर्तता

मुंबई, दि. २९: राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांना ५०० नवीन रुग्णवाहिका पुरविण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केलेल्या घोषणेची पूर्तता केली असून या नवीन रुग्णवाहिका महिनाभरात उपलब्ध होतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.

यासंदर्भात माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, मार्चमध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पाच्या भाषणात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी राज्यातील आरोग्य केंद्रातील जुन्या झालेल्या १००० रुग्णवाहिका टप्प्याटप्प्याने बदलून त्याजागी नवीन रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली होती. यावर्षी ५०० आणि पुढील वर्षी ५०० अशा नवीन रुग्णवाहिका देण्यात येणार असे त्यांनी जाहीर केले होते. बऱ्याच आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका जुनाट झाल्या आहेत. त्या दुरूस्तीयोग्य न राहिल्याने निर्लेखित करण्यात आल्या आहेत.

यावर्षी ५०० नवीन रुग्णवाहिका घेण्यासाठी ८९ कोटी ४८ लाख अंदाजित खर्चासाठी प्रशासकीय मान्यता नुकतीच देण्यात आली असून त्यानुसार एक महिन्याच्या कालावधीत नवीन रुग्णवाहिका उपलब्ध होणार असल्याचे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी सांगितले. या ५०० नवीन रुग्णवाहिका २५३ प्राथमिक आरोग्य केंद्र, १३७ ग्रामीण रुग्णालये, १०६ जिल्हा व उप जिल्हा तसेच स्त्री रुग्णालये आणि ४ प्रादेशिक मनोरुग्णालये यांना देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

गामीण भागातील शासकीय आरोग्य यंत्रणेच्या रुग्णवाहिका या कायमच टीकेचा विषय ठरतात. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्यात येत असून आता नवीन रुग्णवाहिका आल्यावर ग्रामीण व दुर्गम भागातील जनतेला अधिक चांगल्या प्रकारे आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी मदत होणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

००००

अजय जाधव..२९.७.२०२०

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.