कोव्हिडमध्ये विकास कामांची गती मंदावू नये म्हणून शासकीय कंत्राटदारांसाठी विविध उपाययोजना जाहीर
कोव्हिडची महामारी ही नैसर्गिक आपत्ती गृहित धरून शासकीय कंत्राटदारांच्या अडचणींवर उपाय करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या उपाययोजनांमुळे कंत्राटदारांकडे रोकडसुलभता येऊन विकास कामांची गती मंदावणार नाही.
केंद्र शासनाच्या गृह विभागाने तसेच राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी करुन लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे बांधकाम प्रकल्पांची गती मंदावली आहे. केंद्र शासनाने कोव्हिड-19 महामारी ही नैसर्गिक आपत्ती म्हणून गृहित धरुन अनेक शासकीय कंत्राटांमध्ये “दैवी आपत्ती” तरतूद (Force Majeure Clause) वापरण्याचा सूचना दिल्या आहेत. केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शासनाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना चालू कंत्राटाबाबत सोसाव्या लागत असलेल्या अडचणींसंदर्भात उपाययोजना व सहाय्य करणे याबाबत निर्णय घेण्यात आला असून शासकीय कामाच्या पूर्णत्वासाठी मुदतवाढीची विनंती कंत्राटदाराने केल्यास त्यास दि.15 मार्च, 2020 ते दि.15 सप्टेंबर, 2020 अशी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात येईल. या काळासाठी भाववाढीसंदर्भात कंत्राटातील अटी व शर्ती लागू राहतील.
सुरक्षा अनामत रक्कम (Security Deposit) चालू देयकांमधून (RA Bills) वजा करण्यात येते, अशा प्रकरणी चालू देयकांतून करावयाच्या वजावटीचे प्रमाण कमी करुन आणि/ अथवा वजावटीचा कालावधी अधिक देयकांकरिता वाढविण्यात येईल. ज्या प्रकरणी चालू देयकांमधून वसूल करावयाच्या सुरक्षा अनामत रकमेची वजावट पूर्ण झालेली असल्यास ती रक्कम कंत्राटदारास प्रदान करुन या रकमेबाबत कंत्राटदाराकडून विनाशर्त बँक गॅरंटी (दोष दायित्व निवारण कालावधीपर्यंत) घेण्यात येईल.
निविदा रकमेहून कमी रकमेचा देकार प्राप्त होतो म्हणून अतिरिक्त सुरक्षा अनामत (Additional Security Deposit) रक्कम बँक हमी/डी.डी. घेतली जाते, त्याप्रकरणी 50 टक्क्याहून अधिक रकमेचे काम पूर्ण झाले असल्यास 50 टक्के अनामत रक्कम हमी/डी.डी. कंत्राटदारास परत करण्यात येईल. बाकी अनामत रक्कम डी.डी.च्या स्वरुपात असल्यास ती विनाशर्त बँक गॅरंटीच्या मोबदल्यात मुक्त करण्यात येईल. काम पूर्ण झाले आहे.
विशेष कंत्राटांमध्ये (उदाहरणार्थ, बांधा-वापरा-हस्तांतरीत करा, ई.पी.सी. मॉडेल) कामगिरीसाठी अनामत रक्कम (Performance Security) बँक हमीच्या स्वरुपात घेण्यात येते, अशा प्रकरणी 50 टक्क्याहून अधिक रकमेचे काम पूर्ण झाले असल्यास ज्या प्रमाणात काम पूर्ण झाले आहे त्याच्या 50 टक्के प्रमाणात अनामत रक्कम (हमीची रक्कम) कंत्राटदारास परत करण्यात येईल.
शासकीय कंपन्या, शासकीय उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था, निमशासकीय संस्था या सदर मार्गदर्शक सूचना योग्य त्या फेरफारांसह लागू करु शकतील.
—–०—–
धर्मादाय संघटनेमधील पदोन्नती साखळी सुधारणार
धर्मादाय संघटनेमधील पदोन्नती साखळीत समतोल आणण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 मधील कलम ५ पोट – कलम (2अ) मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या अधिनियमातील दुरुस्तीबाबतचे विधेयक विधानमंडळास सादर करण्यात येईल.
यापूर्वी सेवा प्रवेश नियम करत असताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असल्यामुळे या अधिनियमात पुनश्च सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
निम्न पदावरुन पदोन्नतीने किंवा नामनिर्देशनाने नियुक्ती करताना सर्वसाधारणपणे ५०:५० हे सेवाभरतीचे प्रमाण विहीत करण्यासंबंधी सूचना दिल्या आहेत. धर्मादाय संघटनेतील सहायक धर्मादाय आयुक्त या पदावर (४१ जागा) पदोन्नतीने निम्न संवर्गातील (अधीक्षक, जनसंपर्क अधिकारी, प्रशासकीय अधिकारी) अशी एकूण १३५ मंजुर पदे आहेत. तथापि, या सुधारणेत सहायक धर्मादाय आयुक्त या पदावर पदोन्नतीने निम्न संवर्गातून (अधीक्षक) पदे भरण्याची तरतूद केली नसल्याने धर्मादाय संघटनेतील सर्व निम्न संवर्गातील पदांच्या पदोन्नती साखळीतील समतोल राखता येणे शक्य होणार नाही. तसेच धर्मादाय संघटनेत अधिक्षक संवर्गात ९९ मंजुर पदांपैकी ३९ पदे ही सरळसेवेने भरण्यात आलेली आहेत.
त्यामुळे निम्न संवर्गातून सहायक धर्मादाय आयुक्त पदावर पदोन्नतीची पदे उपलब्ध असतानादेखील पदोन्नतीच्या तरतुदीअभावी एकाच संवर्गात संबंधित अधीक्षक / प्रशासकीय अधिकारी यांना सेवानिवृत्त होईपर्यत त्याच पदाचे कामकाज पाहावे लागेल. त्यामुळे त्यांचेमध्ये नैराश्य येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अधीक्षक / जनसंपर्क अधिकारी या पदोन्नतीने रिक्त होणाऱ्या जागेवर निम्न संवर्गातून (निरीक्षक/न्याय लिपिक) पदोन्नतीसाठी पदे उपलब्ध होत असल्याने सर्व संवर्गातील निम्न श्रेणीतील पदोन्नतीच्या प्रक्रियेत अडथळा न येता ती सुरळीतपणे होऊ शकेल व पदोन्नती साखळीमध्ये त्रिमीती (pyramid) राखणे सुयोग्य होईल.
—–०—–
कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगांना अधिक प्रोत्साहन देण्याचा निर्णय
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कृषीवर आधारित अन्न प्रक्रिया उद्योगांना अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी सुधारित निकषास मान्यता देण्याचा आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
कृषीवर आधारित व अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी मोठे व विशाल प्रकल्प निकष खालीलप्रमाणे सुधारीत करण्यात आले.
आकांक्षित जिल्हे- गडचिरोली, नंदुरबार, उस्मानाबाद, हिंगोली यांच्यासाठी मोठ्या प्रकल्पातील गुंतवणूक 50 ते 100 कोटी रुपये असेल तर 100 कोटीपेक्षा अधिक अथवा 200 रोजगार असलेला प्रकल्प हा विशाल प्रकल्प असेल.
मराठवाडा, विदर्भ, धुळे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी मोठ्या प्रकल्पातील गुंतवणूक 50 ते 200 कोटी रुपये असेल तर 200 कोटीपेक्षा अधिक अथवा 300 रोजगार असलेला प्रकल्प हा विशाल प्रकल्प असेल.
उर्वरित महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रकल्पातील गुंतवणूक आता 50 ते 250 कोटी रुपये असेल तर 250 कोटीपेक्षा अधिक अथवा 500 रोजगार असलेला प्रकल्प हा विशाल प्रकल्प असेल.
राज्य वस्तू व सेवा करावर आधारित प्रोत्साहने
आकांक्षित जिल्हे- गडचिरोली, नंदुरबार, उस्मानाबाद, हिंगोली प्रकल्पांना 10 वर्षांसाठी भांडवली गुंतवणुकीच्या मर्यादेत 110 टक्के प्रोत्साहन व औद्योगिक विकास अनुदान 100 टक्के ढोबळ राज्य वस्तु व सेवा कर राहील.
मराठवाडा, विदर्भ, धुळे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रकल्पांना 10 वर्षांसाठी भांडवली गुंतवणुकीच्या मर्यादेत 100 टक्के प्रोत्साहन व औद्योगिक विकास अनुदान 100 टक्के ढोबळ राज्य वस्तु व सेवा कर आधारित राहील.
उर्वरित महाराष्ट्रासाठी अ/ ब तालुक्याकरिता 50 टक्के, क तालुका- 75 टक्के, ड / ड+ तालुका- 100 टक्के असे 10 वर्षांसाठी भांडवली गुंतवणुकीच्या मर्यादेत
प्रोत्साहन राहील तसेच 100 टक्के ढोबळ राज्य वस्तु व सेवा कर आधारित प्रोत्साहन मिळेल.
प्रोत्साहनांसाठी अटी व शर्ती
कृषी आधारित व अन्न प्रक्रिया क्षेत्रातील ज्या उद्योग घटकांनी गुंतवणूक केली आहे. तथापि अद्याप पात्रता प्रमाणपत्र घेतलेले नाही अशा घटकांना सदर लाभ अनुज्ञेय राहतील. सदर प्रोत्साहने सामूहिक प्रोत्साहन योजना 2019 च्या योजना कालावधी दिनांक 31.03.2024 पर्यंत लागू राहतील.
कृषी आधारित व अन्न प्रक्रिया क्षेत्रातील मोठे व विशाल प्रकल्पांना एकूण भांडवली गुंतवणुकीच्या 10 टक्के किंमत (रुपये कमाल रु. 10 कोटी पर्यंत) अथवा 20 हेक्टर क्षेत्र एवढी मर्यादा भूखंडाकरिता राहील.
कृषी आधारीत व अन्न प्रक्रिया क्षेत्रातील नाशवंत घटकांच्या प्राथमिक प्रक्रिया क्षेत्रातील केवळ शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या अथवा जे उद्योग शेतकरी उत्पादक कंपन्यांकडुन कच्चा माल घेतील अशाच कृषी आधारीत व अन्न प्रक्रिया क्षेत्रातील मोठे व विशाल प्रकल्पांना वरील लाभ देय राहतील. दुय्यम व तृतीय स्तरीय अन्न प्रक्रिया गटातील उद्योगांची वर्गवारी कृषी विभागाकडून प्रमाणित करण्यात येईल व असे उद्योग वरील प्रमाणे गुंतवणुकीचे निकष गटाप्रमाणे पूर्ण करत असल्यास त्यांना मोठे व विशाल प्रकल्प दर्जा देण्यात येईल.
औद्योगिक विकास अनुदान म्हणून ढोबळ राज्य व वस्तू सेवा कर आधारित प्रोत्साहने राज्यांत होणाऱ्या प्रथम विक्रीवर देय राहतील.
कृषी आधारित व अन्न प्रक्रिया क्षेत्रातील मोठे व विशाल प्रकल्पांना राज्य शासनाकडून अन्य कोणत्याही विभागाकडून मिळणारी प्रोत्साहने त्यांच्या गटातील अनुज्ञेय भांडवली गुंतवणुकीच्या व वार्षिक प्रोत्साहनाच्या मर्यादेत राहतील.
कार्बोनेटेड पेय (शित पेय), बाटली बंद पेय जल, इथेनॉल, चिविंग गम व ज्या तयार मालांचा वस्तू व सेवा कर 28% आहे अशा तयार मालाच्या उत्पादन उद्योगांना व अशा प्रक्रिया घटकांना सदर सामूहिक प्रोत्साहन योजनेतील लाभ अनुज्ञेय राहणार नाहीत.
—–०—–
महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्पास मान्यता
आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (MAGNET) या प्रकल्पास मान्यता व आशियाई विकास बॅंकेसोबत करार करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे फळे व भाजीपाला उत्पादनास मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळेल व शेतकऱ्यांना लाभ होईल.
फळे आणि भाजीपाल्यांची राज्यात पुढील 5 वर्षांपर्यंत वाढती मागणी लक्षात घेऊन तसेच विविध टप्प्यांमध्ये फळ भाजीपाल्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता या मॅग्नेट नेटवर्कमधून अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्पाची (Maharashtra Agribusiness Network -MAGNET) राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये 6 वर्षासाठी (2020 ते 2026 पर्यंत) अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली.
हा प्रकल्प एकूण 142.9 दशलक्ष डॉलर्स (सुमारे रु. 1000 कोटी) इतक्या रक्कमेचा असून त्यापैकी 70% निधी (100 दशलक्ष डॉलर्स) आशियाई विकास बँकेकडून कर्ज स्वरुपात, 30% निधी (42.9 दशलक्ष डॉलर्स) राज्य शासनाचा स्वत:चा निधी असेल.
आर्थिक व्यवहार विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार यांच्या उपस्थितीत आशियाई विकास बॅंकेसोबत कर्जाच्या वाटाघाटी (Loan Negotiations) करुन कर्ज पुरवठयाबाबत अटी व शर्ती निश्चित करण्यास राज्य शासनाच्या वतीने प्रधान सचिव (वित्त) व प्रधान सचिव (पणन) यांना प्राधिकृत करण्यात येईल.
कर्जाच्या वाटाघाटीनंतर, भारत सरकार व आशियाई विकास बँक यांच्या दरम्यान कर्ज करार (Loan Agreement) करण्यास मान्यता देण्यात आली. कर्जाच्या वाटाघाटी दरम्यान आशियाई विकास बॅंकेकडून कर्जाच्या परतफेडीचा कालावधी निश्चित करण्यासाठी प्रधान सचिव (वित्त) व प्रधान सचिव (पणन) यांना प्राधिकृत करण्यात येईल.
—–०—–
विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ७ सप्टेंबरपासून
महाराष्ट्र विधानमंडळाचे आगामी तिसरे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सोमवार 7 सप्टेंबरपासून बोलविण्यात येण्याची शिफारस राज्यपालांना करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
यापूर्वी 3 ऑगस्टपासून हे अधिवेशन घेण्याचे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरले होते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असल्याने हे अधिवेशन 7 सप्टेंबरपासून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
—–०—–
इतर वृत्त :
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 10 वी निकाल 95.30 टक्के लागला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 18.20 टक्क्यांची वाढ आहे असे सांगितले. मुलींचा निकाल मुलांच्या तुलनेत चांगला आहे अशीही माहिती त्यांनी दिली. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले. कोरोना परिस्थितीतही प्रयत्नपूर्वक हा निकाल दिलेल्या वेळेत लावल्याचे शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितले.
——
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत लवकरच बैठक
गेल्या तीन ते चार महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात अडचणी येत असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी चर्चेदरम्यान सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी लवकरच या संदर्भात बैठक घेऊन यावर मार्ग काढणार असल्याचे सांगितले.
—–
वाढीव वीज बिलांबाबत पुढील बैठकीत प्रस्ताव आणणार
वाढीव वीज बिलांबाबत आज बैठक घेण्यात आली असून पुढील मंत्रिमंडळ बैठकीत लाखो घरगुती ग्राहकांना दिलासा देण्यासाठी प्रस्ताव आणणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली.
—–
सहकार व पणन मंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांना आज मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळाच्यावतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बाळासाहेब पाटील यांना उपमुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ दिला.
——
कोविड रुग्णांचा शोध आणि संपर्क शोधण्यावर अधिक भर द्यावा – मुख्यमंत्री
कोविड संदर्भातील मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पालिकांना कोविड रुग्णांचा शोध आणि जास्तीत जास्त संपर्क शोधण्यावर भर देण्यासंदर्भात सर्व मंत्र्यांना सूचना केल्या. ते म्हणाले की, गेल्या आठवड्यात मुंबईतील वॉर्ड अधिकाऱ्यांच्या बैठकीत देखील आपण कुठेही गाफील न राहता संकट आटोक्यात येत नाही तोपर्यंत सावध राहण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. केवळ लॉकडाऊन करणे महत्त्वाचे नाही तर रुग्णांचा शोध घेऊन त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे तसेच त्यांना वेळीच अलगीकरण सुविधेमध्ये दाखल करणे, योग्य ते उपचार तात्काळ सुरु करणे आवश्यक आहे. सर्व पालिकांनी या दृष्टीने अतिशय काटेकोरपणे कार्यवाही करावी.
पीपीई कीट आणि मास्कचा पुरवठा 1 सप्टेंबर नंतर बंद करण्याचे केंद्राने सांगितले आहे. मात्र, आपण पंतप्रधानांना हा पुरवठा पुढील काळात देखील सुरु ठेवावा अशी विनंती केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी प्रधान सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, महाराष्ट्रामधील मृत्युदर आता 3.62 टक्के इतका कमी झाला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 27 दिवसांवर गेला आहे. मुंबईमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 70 दिवस झाला आहे. दर 10 लाख लोकसंख्येमध्ये सर्वाधिक रुग्ण हे ठाणे, मुंबई आणि पुणे या भागातील असून कल्याण-डोंबिवली महापालिका, पुणे, उल्हासनगर, नवी मुंबई या पालिकांमध्ये जास्त प्रमाणात रुग्ण आढळत आहेत.
—–०—–