अन्न व औषध प्रशासनाच्या गुप्तवार्ता विभागास मिळालेल्या माहितीनुसार अन्न व औषध प्रशासन, ठाणे व गुप्तवार्ता विभाग, मुंबई यांचे संयुक्त पथकाने दि 28 जुलै, 2020 रोजी मे. सतीया न्युट्रास्युटीकल्स, कोणगाव, ता. भिवंडी, जि. ठाणे यांच्या गोदामावर छापा घालून मे. नेवस लाईफ न्युट्रासायन्स, अहमदाबाद यांचेमार्फत उत्पादित मे. ओलेना हेल्थ (ओपीसी) प्रा. लि. 101 ए, पंचरत्न बिल्डींग, ऑपेरा हाऊस, मुंबई यांचेमार्फत मार्केटींग केला जाणाऱ्या ओलेना (1000 मिलीग्रॅम विटामिन सी) टॅबलेट्स तसेच मे. साई प्रो बायोटेक प्रा. लि., ता. मुळशी, जि. पुणे यांचेमार्फत उत्पादित मे. सतीया न्युट्रास्युटीकल्स., कोणगाव, ता. भिवंडी, जि. ठाणे यांचे मार्फत मार्केटींग केला जाणारा कार्डीओ (Plix) या अन्न पदार्थाचा साठा कारवाई करुन जप्त केला आहे.
- ओलेना (1000 मिली ग्रॅम विटामिन सी) टॅबलेट्स – अन्न पदार्थाच्या वेष्टनावर विटामिन सी 1000 मिली ग्रॅम असा मजकूर छापला आहे. प्रत्यक्षात ही मर्यादा आयसीएमआर ( ICMR ) पेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे. आयसीएमआर (ICMR) नुसार विटामिन सी ची मर्यादा ही केवळ 40 मिली ग्रॅम असणे बंधनकारक आहे. हा मजकूर हा जनतेची दिशाभूल करणारा व मिथ्याछाप असल्याचे निदर्शनास आले आहे.
- या ठिकाणी ओलेना (1000 मिली ग्रॅम विटामिन सी) टॅबलेट्सचे 784 युनिट्स एकूण किंमत रु.4,31,200/ – चा साठा जप्त.
- कार्डिओ (Plix) अन्न पदार्थाच्या वेष्टनावर No Sugar Added असा मजकूर छापला आहे. तथापि वेष्टनावरील घटक पदार्थांच्या यादीत Fructose घातल्याचे नमूद आहे. हा मजकूर हा जनतेची दिशाभूल करणारा व मिथ्याछाप असल्याचे निदर्शनास आले आहे.
- या ठिकाणी कार्डिओ ( Plix ) चे 106 युनिट्स एकूण किंमत रु.1,69,600/ – चा साठा जप्त.
- या छाप्यात एकूण रु.6,00,800/ – चा साठा जप्त करण्यात आलेला आहे.
ही कारवाई ही कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, अन्न सुरक्षा आयुक्त, यांनी दिलेल्या निर्देशानुसार व सह आयुक्त (गुप्तवार्ता), सह आयुक्त (को.वि), अन्न व औषध प्रशासन, ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सहायक आयुक्त, भिवंडी, डॉ भूषण मोरे, अन्न सुरक्षा अधिकारी एम.ए.जाधव, निलेश विशे, बी.सी. बसावे यांनी सक्रिय सहभाग घेऊन कारवाई यशस्वी केली.