पाणीपुरवठा विभागातील तालुका स्तरावरील समूह व गट समूह समन्वयकांच्या सेवा ३० सप्टेंबरपर्यंत सुरु ठेवण्यास मुदतवाढ

Last Updated by संपादक

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती

जळगाव, (जिमाका) दि. 29 – पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन येथील कंत्राटी सल्लागार कर्मचारी तसेच तालुका स्तरावरील समूह समन्वयक व गट समूह समन्वयकांच्या सेवा 30 सप्टेंबरपर्यंत सुरु ठेवण्यास मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. या निर्णयाचा राज्यातील तालुका पातळीवरील 351 गट समन्वयक व 899 समूह समन्वयकांना लाभ होणार असल्याचे  श्री. पाटील यांनी सांगितले.

मंत्री श्री.पाटील म्हणाले , जल जीवन मिशन अंतर्गत तालुका पातळीवर 351 गट समन्वयक व 899  समूह समन्वयकांची पदे स्वच्छ भारत मिशनच्या कामासाठी दि. 6 जुलै, 2011 च्या शासन निर्णयान्वये निर्माण करण्यात आली होती. या पदांचे मानधन व भत्ते राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या सहाय्य निधीमधून देण्यात येत आहेत. तथापी, जल जीवन मिशनच्या मार्गदर्शक सुचनांनुसार गट समन्वयक व समूह समन्वयक या पदांसाठी निधीची उपलब्धता नसल्याने या पदांच्या सेवा 31 जुलै, 2020 रोजी समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

परंतु ग्रामीण भागासाठी या पदांची आवश्यकता लक्षात घेऊन या पदांना मुदतवाढ मिळावी, याकरिता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करुन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री.पाटील यांनी पदांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही  यावेळी सांगितले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.