बहिणींच्या मदतीला पोस्ट कार्यालय सज्ज

नांदेड, दि. २९ :आठवडा विशेष टीम― राखीचा सण येत्या सोमवार ३ ऑगस्ट २०२० रोजी असल्यामुळे महाराष्ट्र पोस्टल सर्कलने रविवारी २ ऑगस्ट रोजी पोस्ट कार्यालयांमध्ये राखी टपालाची विशेष वितरण व्यवस्था केली आहे. राख्या वेळेत भावापर्यंत पोहचण्यासाठी टपाल कार्यालयाच्या स्पीड पोस्ट सेवा तत्पर ठेवल्या असून लोकांनी या सेवेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड डाक विभागाचे सहायक अधीक्षक डॉ. बी. एच. नागरगोजे यांनी केले आहे.

“राखी” हा सण भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा उत्सव आहे, ज्यात भावनिक ओढ आहे. दरवर्षी राखी टपाल हाताळण्यासाठी टपाल विभाग विशेष काळजी घेतो. यावर्षी देखील राख्यांचे टपाल पोस्ट ऑफिसवर बुक करावेत. राखी टपालाची प्राधान्यक्रमानुसार बुकिंग, प्रक्रिया आणि वितरणाची विशेष व्यवस्था महाराष्ट्रातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये करण्यात आली आहे. राखी टपालाच्या वेगवान प्रक्रियेसाठी राखी टपाल सेंटर मुंबई व नवी मुंबई येथेही सुरू करण्यात आले आहेत.

यावर्षी कोविडची परिस्थिती लक्षात घेता टपाल विभागाने विशेष नियोजन केले आहे. त्याच शहरात राहणाऱ्या भावंडांना कोविड नियंत्रणासाठी असलेल्या व्यवस्थापनामुळे भेट घेणे जिकरीचे ठरेल. कंटेन्मेंट झोन किंवा सीलबंद इमारतींमध्ये कोणाचे भाऊ-बहिणी रहात असतील तर त्यांच्या भावनिक भावबंधाचा विचार करुन पोस्ट ऑफिसचे सर्व कर्मचारी सेवेसाठी तत्पर झाले आहेत.

या कोविड काळात, पोस्ट विभागाने राखी टपालाचे संकलन, प्रसार आणि वितरण यास सर्वात जास्त प्राधान्य दिले आहे. “स्पीड पोस्ट राखीच्या वितरणामुळे या कठीण काळात लोकांच्या जीवनात होईल आनंद” अशी घोषणा घेऊन पोस्ट ऑफिस तत्पर असल्याचेही सहायक अधीक्षक डॉ. नागरगोजे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.