महिलांबाबत गैरप्रकार खपवून घेणार नाही – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. ३० : मोदी हॉस्पिटलमध्ये घडलेला प्रकार अत्यंत घृणास्पद व निंदनीय असून सदर गुन्हेगारास कठोर शिक्षा मिळावी. सदर व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अटक करण्यात आली आहे. असा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. अशा समाजकंटकांवर कायद्याची जरब निर्माण करावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी येथे दिले.

येथील मोदी रुग्णालयात एका युवतीचा कोरोना चाचणीसाठी थ्रोट स्वॅब घेतल्यानंतर लॅब टेक्निशियनने तिला अनावश्यक चाचणी करण्यास सांगून गैरवर्तणूक केली. त्यानंतर युवतीला आक्षेपार्ह संदेशही पाठवले. या अश्लाघ्य प्रकाराची तक्रार पीडित मुलीने बडनेरा पोलिसात नोंदवली आहे. पालकमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली असून अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कायद्याची जरब निर्माण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या, माता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई, माता अहिल्या यांच्या महाराष्ट्रात असा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. महिलांचा सन्मान झालाच पाहिजे. या प्रकरणी चौकशी करून संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. त्यानुसार सदर टेक्निशियनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलींनी निर्भयपणे पुढे येण्याची गरज

अनेकदा असे प्रकार घडले तरी मुली तक्रारी करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे अशा प्रवृत्ती फोफावतात. त्यामुळे मुलींनी निर्भयपणे पुढे येऊन तक्रार केली पाहिजे व गुन्हेगारी वृत्तीला वेळीच ठेचले पाहिजे. पालकांनीही याबाबत मुलींशी सुसंवाद ठेवून त्यांना निर्भय बनविले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत अन्याय सहन करता कामा नये. मुलींनी निर्भयपणे बोलावे, पुढे यावे, व्यक्त व्हावे, घाबरू नये. शासन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे, असे श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

सुसंस्कार व समुपदेशनाची गरज

युवा पिढीत अशी विकृती निर्माण होऊ नये म्हणून सर्वांनी एकत्रित आले पाहिजे. समाजातील अशी विकृती नष्ट करण्यासाठी सुसंस्कार व सातत्यपूर्ण समुपदेशनाची गरज आहे. महिलांचा सन्मान राखला गेला पाहिजे. त्यासाठी युवा पिढीला सुसंस्कारित करणे व विधायक कार्याकडे वळविण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.

अमरावती जिल्ह्यातून महिला देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचली आहे. महिलांचा गौरव करणारी, त्यांच्या कार्यकर्तृत्वाला वाव देणारी भूमी असा जिल्ह्याचा लौकिक आहे. या जिल्ह्यात असा प्रकार घडणे लांच्छनास्पद आहे. हा प्रकार अत्यंत संतापजनक असून, गुन्हेगाराला कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यापुढे असा प्रकार करण्याची हिंमतच कुणात होऊ नये, यासाठी कायद्याची जरब निर्माण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.