या कालावधीत विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आणि महानगर पालिका आयुक्त त्यांच्या क्षेत्रात आवश्यक निर्बंध घालू शकतील. अत्यावश्यक नसलेल्या कामांसाठी तसेच नागरिकांच्या चलनवलनास प्रतिबंध घालू शकतील. लोकांनी या काळात सामाजिक अंतर, व्यक्तिगत स्वच्छता या बाबींचे पालन करणे आवश्यक राहील.
कोवीड विषाणू नियंत्रणासाठी राष्ट्रीय स्तरावरील सूचना
- मास्कचा वापर- सार्वजनिक ठिकाणे, कार्यस्थळे या ठिकाणी तसेच प्रवासादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक आहे.
- सामाजिक अंतर पाळणे (सोशल डिस्टंसिंग) : प्रत्येक व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी वावरताना इतरांपासून किमान 6 फुटाचे (दो गज की दूरी) अंतर राखावे.
- ग्राहक सुरक्षित अंतर राखतील याची दुकानदारांनी काळजी घ्यावी, दुकानांमध्ये एका वेळी 5 व्यक्तिंपेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश देऊ नये.
- जमावाबाबतची बंधने : मोठ्या प्रमाणावर जमाव होऊ शकणारे समारंभ/सभा आदींना यापुढेही प्रतिबंध राहील. विवाह सोहळ्याला 50 पेक्षा अधिक अधिक अभ्यागतांना आमंत्रित करता येणार नाही. अंत्यसंस्कार आणि त्यासंबंधित विधींना 20 पेक्षा अधिक व्यक्तींना सहभागाची परवानगी नसेल.
- सार्वजनिक ठिकाणी थुंकणे शिक्षापात्र असून त्यासाठी संबंधित प्राधिकरणाचे कायदे, नियम, नियमनानुसार असलेला दंड लागू राहील.
- सार्वजनिक ठिकाणी मद्य, पान, तंबाखू इ. चे सेवन करण्यास प्रतिबंध राहील.
कामाच्या ठिकाणी पाळावयाच्या मार्गदर्शक सूचना :
- घरातून काम (वर्क फ्रॉम होम) : शक्यतोवर घरातूनच काम करण्याची पद्धत अवलंबली पाहिजे.
- कार्यालये, कामाची जागा, दुकाने, बाजारपेठ, औद्योगिक तसेच व्यावसायिक आस्थापनांमध्ये कामाचे/ व्यवसायाच्या वेळेचे विभाजन करण्याचा नियम पाळला पाहिजे.
- तपासणी व स्वच्छता – कार्यालयाच्या सर्व प्रवेशद्वारांवर तसेच बाहेर पडण्याच्या दरवाज्याजवळ थर्मल स्कॅनिंग (शरीराचे तापमान मोजणे), हात धुणे आणि सॅनिटायझर ची व्यवस्था करावी.
- संपूर्ण कामाची जागा, सामान्य सुविधा आणि मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व गोष्टींची/ वस्तूंची वारंवार स्वच्छता करण्यात यावी. शिफ्टमध्ये काम करताना प्रत्येक शिफ्टनंतर दरवाज्याचे हॅन्डल इत्यादी गोष्टींची स्वच्छता राखणे आवश्यक आहे.
- सुरक्षित अंतर :- कामाच्या ठिकाणी असलेले सर्व कर्मचारी / कामगारांमध्ये प्रत्येक शिफ्टच्या वेळांमध्ये पुरेसे अंतर ठेऊन काम करतील. तसेच भोजनाच्या वेळांमध्ये सुयोग्य अंतर राहील याची दक्षता संबंधित आस्थापना प्रमुखांनी घेणे आवश्यक आहे.
मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर क्षेत्रात खालील कामांना, याआधी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांमध्ये सूचित केलेल्या निर्बंधांच्या अधिन राहून संमती देण्यात येत आहे. या कामाच्या नियमावली संबंधीत स्थानिक प्राधिकरणामार्फत निर्गमित केल्या जातील.
- या आदेशापूर्वी संमती देण्यात आलेली सर्व अत्यावश्यक दुकाने खुली राहतील.
- अत्यावश्यक नसलेली दुकाने सुरु ठेवण्यास ३१ मे, ४ जून आणि २९ जून रोजीच्या आदेशांमधील शिथिलता आणि मार्गदर्शिकेनुसार तसेच संबंधीत महापालिकेने निश्चित केलेल्या धोरणाच्या अधीन राहून संमती देण्यात येत आहे. अत्यावश्यक नसलेल्या वस्तुंचे मार्केटस्, मार्केट क्षेत्र आणि दुकाने ही सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली राहतील. मद्याची दुकाने ही संमती देण्यात आली असल्यास किंवा होम डिलीव्हरी (घरपोच सेवा) सुरु राहील.
- ऑगस्ट २०२० पासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सेस सुरु राहतील. तथापी, याठिकाणी असणारे थिएटर्स, फूड कोर्टस्, रेस्टॉरंटस् यांना सुरु करण्यास संमती नसेल. तथापि, या मॉल्समधील रेस्टॉरंट आणि फूड कोर्टसमधील किचनला होम डिलीव्हरी (मोठ्या वाहनांमार्फत (अग्रेगेटर्स) घरपोच सुविधा) देण्यासाठी सुरु ठेवण्यास संमती असेल.
- अत्यावश्यक तसेच अत्यावश्यक नसलेल्या वस्तु व साहित्यांच्या ऑनलाईन खरेदीसाठी ई-कॉमर्स व्यवस्था सुरु राहील.
- सध्या सुरु असलेले उद्योग सुरु राहतील.
- संमती देण्यात आलेली सर्व सार्वजनिक तसेच खाजगी बांधकामे सुरु राहतील. संमती देण्यात आलेली सर्व मान्सुनपूर्व सार्वजनिक तसेच खाजगी कामे सुरु राहतील.
- होम डिलीव्हरी (घरपोच सेवा) रेस्टॉरन्ट्स आणि किचन (स्वयंपाकगृहे) सुरु राहतील.
- ऑनलाईन दूरशिक्षण आणि त्याच्याशी संबंधीत कामे सुरु राहतील.
- सर्व सरकारी कार्यालये (अत्यावश्यक सेवा, आरोग्य आणि वैद्यकीय, कोषागारे, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, एनआयसी, अन्न आणि नागरी पुरवठा, एफसीआय, एनवायके, महापालिका सेवा यांना वगळून) १५ टक्के कर्मचारी किंवा १५ कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या क्षमतेसह सुरु राहतील.
- सर्व खासगी कार्यालये ही १० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या क्षमतेसह सुरु राहतील.
- स्वयंरोजगाराशी संबंधित व्यवसाय उदा. प्लंबर, इलेक्ट्रिशियन, कीटक-नियंत्रण (पेस्ट कंट्रोल) आणि तंत्रज्ञ यांची कामे सुरु राहतील.
- गॅरेजेस, वर्कशॉपमधील कामे नियोजित वेळ घेऊन पूर्वसंमतीसह सुरु ठेवता येतील.
- मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) अंतर्गत महानगरपालिका क्षेत्रात अत्यावश्यक कामांसाठी तसेच कार्यालयीन कामासाठी अंतर्गत वाहतुकीस परवानगी असेल. लोकांनी खरेदीसाठी फक्त जवळपास/ शेजारच्या बाजारपेठामध्ये जाणे अपेक्षित आहे. अनावश्यक वस्तू खरेदीसाठी लांब पल्ल्याच्या प्रवासांना परवानगी दिली जाणार नाही.
- 23 जून 2020 च्या आदेशानुसार मोकळ्या जागा, लॉन, वातानुकूलित नसलेल्या हॉलमध्ये लग्नाशी संबंधित कार्यक्रमांना परवानगी राहील.
- काही निर्बंधांसह मोकळ्या भागात शारीरिक व्यायामांना (फिजिकल अॅक्टिव्हिटी) परवानगी राहील.
- वर्तमानपत्रांचे मुद्रण व वितरण व त्यांचे घरपोच सेवा (होम डिलिव्हरी) यांना संमती असेल.
- शैक्षणिक संस्था (विद्यापीठे/महाविद्यालय/शाळा) मधील कार्यालये, कर्मचाऱ्यांना ई-सामग्रीचा विकास, उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन आणि निकाल जाहीर करणे आदी कामांसारख्या अशैक्षणिक कामांसाठी परवानगी असेल.
- राज्य शासनाने परवानगी दिलेली केशकर्तनालये, स्पा, सलून, ब्यूटी पार्लर यांना २५ जून २०२० रोजीच्या शासन आदेशातील निर्बंधांच्या अधीन राहून संमती असेल.
- गोल्फ कोर्सेस, आऊटडोअर फायरिंग रेंज, आऊटडोअर जिम्नॅस्टीक, आऊटडोअर बॅडमिंटन आणि मल्लखांब अशा सांघिक नसलेल्या खेळांना ५ ऑगस्ट २०२० पासून संमती असेल. यात शारीरीक अंतर, स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. जलतरण तलावाला (स्विमींग पुल) परवानगी नसेल.
- टॅक्सी, कॅब, ॲग्रीगेटर यांना फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ अधिक ३ या प्रवासी क्षमतेनुसार, रिक्षा फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ अधिक २ या प्रवासी क्षमतेनुसार, चारचाकी फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ अधिक ३ या प्रवासी क्षमतेनुसार तर दुचाकी फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ अधिक १ प्रवासी क्षमतेनुसार (हेल्मेट आणि मास्कसह) चालवण्याची परवानगी राहील.
- कोणत्याही विशिष्ट / सामान्य आदेशाद्वारे परवानगी दिलेली अन्य कोणतीही कामे यांना संमती असेल.
उर्वरित राज्यभरात पुढील बाबींना वेळोवळी निर्गमित केलेल्या अटी-शर्तींवर परवानगी देण्यात आली आहे.
- या आदेशापूर्वी संमती देण्यात आलेली सर्व अत्यावश्यक दुकाने खुली राहतील.
- जिल्हाअंतर्गत बस वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. बसमध्ये एकूण प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के प्रवासी सामाजिक अंतर आणि सुरक्षेची काळजी घेऊन प्रवास करू शकतील.
- आंतरजिल्हा प्रवास नियंत्रित स्वरुपाचा राहील.
- अत्यावश्यक नसलेली मार्केटस्, दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहतील.
- मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सेस ही ५ ऑगस्ट २०२० पासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली राहू शकतील. त्यातील थिएटर्स, फूड कोर्टस्, रेस्टॉरंटस् यांना संमती नसेल. तथापि, रेस्टॉरंट आणि फूड कोर्टसमधील किचनला होम डिलीव्हरी (घरपोच सेवा) देण्यासाठी सुरु ठेवण्यास संमती असेल. संबंधित नागरी किंवा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था याबाबत नियमावली (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) ठरवून देतील.
- खुल्या जागा, लॉन्स आणि वातानुकूलित नसणाऱ्या सभागृहातील विवाह सोहळ्यासाठी २३ जून २०२० च्या निर्णयानुसार परवानगी असेल.
- निर्बंधासह खुल्या जागेतील व्यायाम व इतर शारीरिक हालचाली यांना संमती असेल.
- छपाई आणि वृत्तपत्रांच्या घरपोच वितरणास परवानगी असेल.
- विद्यापीठे/महाविद्यालये/शाळा यांची कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांचे अशैक्षणिक कामांसाठी असणारे कर्मचारी यांना ई कंटेट तयार करणे, उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करणे. परीक्षेचे निकाल घोषित करण्यासाठी परवानगी असेल संशोधक आणि शास्त्रज्ञ यांना उपस्थित राहण्यास परवानगी राहिल.
- केशकर्तनालये, स्पा, सलून्स, ब्युटी पार्लर्स यांना दि. २५ जून २०२० रोजीच्या शासन आदेशानुसार काही अटींवर परवानगी.
- गोल्फ कोर्सेस, आऊटडोअर फायरिंग रेंज, आऊटडोअर जिम्नॅस्टीक, आऊटडोअर बॅडमिंटन आणि मल्लखांब अशा सांघिक नसलेल्या खेळांना ५ ऑगस्ट २०२० पासून संमती असेल. यात शारिरीक अंतर, स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. जलतरण तलावाला (स्विमींग पुल) परवानगी नसेल.
- सार्वजनिक आणि खाजगी वाहनांमध्ये प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी असेल. दुचाकीमध्ये हेल्मेट आणि मास्कसह १ अधिक १ प्रवासी, तीन चाकी वाहनामध्ये चालक आणि २ प्रवासी तर चार चाकी वाहनामध्ये चालक आणि ३ प्रवासी फक्त अत्यावश्यक कामासाठी प्रवास करु शकतील. प्रवासात मास्क परिधान करणे अनिवार्य असेल.
- याशिवाय ज्या बाबींना परवानगी देण्यात आलेल्या असतील त्या बाबी.
राज्यभरात प्रतिबंधित बाबी नियमावली व कार्यप्रणालीचा (स्टँडर्ड ओपरेटिंग प्रोसिजर) अवलंब करुन टप्प्याटप्याने सुरु केल्या जातील किंवा निर्बंध उठवले जातील.