पंजाब व महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदारांच्या ठेवीसाठी आरबीट्रेटरने तातडीने कार्यवाही करावी – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश

मुंबई दि.३० : पंजाब व महाराष्ट्र को.ऑप. बँकेचे खातेदार आणि ठेवीदार यांचे अडकलेले पैसे मिळावेत यादृष्टीने तातडीने कार्यवाही करण्यात यावी.  यासंदर्भात नेमण्यात आलेल्या आरबीट्रेटरने मालमत्ता विकून निधी उभारण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करणे आणि नेमण्यात आलेल्या प्रशासकांनी ठेवीदार, खातेदारांना दिलासा देणे आवश्‍यक आहे. यासंदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडेही पाठपुरावा केला जाईल, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

माजी विधानपरिषद सदस्य आणि काँग्रेस नेते श्री. चरणसिंग सप्रा आणि अडचणीत सापडलेल्या बँक खातेदारांच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनानंतर यासंदर्भात विधानभवन, मुंबई येथे श्री. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन आज करण्यात आले. यावेळी ठेवीदार आणि खातेदारांनी आपल्या समस्या मांडल्या.  बैठकीस रिझर्व्ह बँकेने पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर नेमलेले प्रशासक श्री. जे.बी.भोरीया, सह पोलीस आयुक्त श्री. राजवर्धन सिन्हा, पोलीस उपायुक्त श्री. परोपकारी आदिंसह ठेवीदार आणि खातेदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  पोलीस तपास योग्य दिशेने सुरु असल्याबद्दल ठेवीदार आणि खातेदारांनी समाधान व्यक्त केले. अनेक ठेवीदार हे ज्येष्ठ नागरिक असून त्यांना दैनंदिन खर्चासाठी तसेच गंभीर आजार झालेल्या खातेदारांना उपचार खर्चासाठी आणि  अन्य खातेदारांच्या कर्जापोटीचे मासिक हफ्ते यांसाठी बँकेवरील प्रशासकाने योग्य मार्ग काढावेत अशा सूचना विधानसभा अध्यक्ष श्री.पटोले यांनी यावेळी दिल्या. 

000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.