मुंबई, दि. ३० : राज्यात युरीया खताला असलेली मागणी पाहता केंद्र शासनाकडे पाच लाख मेट्रीक टन अतिरिक्त युरिया साठा देण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना युरीया कमी पडणार नाही, असा दिलासा कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे दिला.
राज्यातील खत पुरवठ्याबाबत माहिती देताना कृषीमंत्री भुसे यांनी सांगितले, राज्यात पेरणी वेळेवर पूर्ण झाली आहे. पावसामुळे पिकांची परिस्थिती समाधानकारक आहे. यंदा खरीपाच्या क्षेत्रात वाढ झाली झाल्याचे दिसून येत असून त्यामुळे एकाचवेळी खतांची मागणी वाढली. त्याचबरोबर यावर्षी द्रवरुप खतांचा वापरही कमी होत आहे परिणामी युरीयाचा वापर वाढला आहे.
राज्यातील खतांची परिस्थिती पाहून नुकतेच केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून राज्यासाठी अतिरिक्त पाच लाख मेट्रीक टन युरिया देण्याची मागणी करण्यात आली असल्याचे श्री. भुसे यांनी सांगितले. राज्य शासनाने केंद्र शासनाकडे १७ लाख मेट्रीक युरीयाची मागणी केली होती मात्र त्यात २ लाख मेट्रीक टन कपात करून राज्याला १५ लाख मेट्रीक टन युरीया पुरवठा झाला आहे. मात्र हा कपात केलेला २ लाख मेट्रीक टन युरीया देखील उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आल्याचे त्यांनी कृषीमंत्र्यांनी सांगितले.
राज्यात गेल्या १५ दिवसांपासून विक्री केलेल्या युरीयाचे ट्रॅकींग केले जात असून एखाद्या शेतकऱ्याला ज्याप्रमाणात युरीया विक्री झाली त्याचे तेवढे क्षेत्र आहे का याची पडताळणी करण्यात येत आहे, असे श्री.भुसे यांनी यावेळी सांगितले. ज्या दुकानांचे साठेबाजी मुळे परवाने रद्द करण्यात आले आहे त्यांना पुन्हा विक्री करण्याची परवानगी देण्यात येणार नसल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी खतांचा संतुलित वापर करण्यासाठी जाणीवजागृती मोहिम घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
00000
अजय जाधव..३०.७.२०२०