वर्धा: प्रत्येक शेतकऱ्याला पिककर्ज मिळवून द्यावे – पालकमंत्री सुनिल केदार

सेलू, समुद्रपूर हिंगणघाट, वर्धा येथे घेतला पीक कर्ज प्रकरणाचा आढावा

वर्धा, दि 31:आठवडा विशेष टीम― कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांसोबतच कृषि क्षेत्राला प्राधान्य देणे राज्य शासनाचे कर्तव्य आहे. जिल्ह्यातील एकही शेतकरी खरीप पिक कर्जापासुन वंचित राहू नये यासाठी बँकांनी अपात्र केलेल्या पिककर्ज प्रकरणाची नोडल अधिकाऱ्यांनी तपासणी करावी, अशा सूचना पालकमंत्री सुनिल केदार यांनी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना दिल्या.

श्री.केदार यांनी आज तहसील स्तरावरील बँक शाखेला भेट देऊन तहसील कार्यालयात पीक कर्ज प्रकरणांचा बँक शाखेनिहाय आढावा घेतला. तसेच शेतकऱ्यांच्या पीक कर्जाबाबत तक्रारी ऐकून घेतल्या. यावेळी त्यांनी नोडल अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

सेलू येथे झालेल्या बैठकीत आमदार समीर कुणावार, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, तहसिलदार महेद्र सोनवणे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक बिरेद्र कुमार उपस्थित होते.

वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून सर्वात जास्त कापूस खरेदी करुन राज्यात अव्वल क्रमांक मिळविला तसाच पिककर्ज वाटपात सुद्धा जिल्हा राज्यात प्रथम आणावा व येत्या दोन दिवसात पिक कर्ज प्रकरणे निकाली काढावेत असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

बँकांनी अपात्र ठरविलेल्या पिककर्ज प्रकरणाची यादी बँकाकडून प्राप्त करुन घ्यावी. तालुकास्तरावर तहसिल, सहायक उपनिबंधक, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, जिल्हा परिषदचे कृषि अधिकारी यांनी नोडल अधिकारी म्हणून तपासावी. प्रत्येक नोडल अधिकांऱ्याने त्यांना नेमून दिलेल्या बँक शाखांना भेटी देऊन बँकांनी त्रोटक कारणाने कर्जप्रकरणे अपात्र ठरविल्यास त्रुटी पूर्ण करण्यास बँकांना सांगावे. तसेच शेतकऱ्यांवरील इतर कर्जामुळे पिक कर्जाची प्रकरणे अपात्र ठरविली असल्यास ओटीएस मध्ये स्थानांतरण करुन पिककर्ज प्रकरणे मंजूर करण्यात यावीत, अशा सूचना श्री.केदार यांनी दिल्या.

नोडल अधिकाऱ्यांनी बँक भेटीप्रसंगी कर्जमाफी योजनेतील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा न झालेली प्रकरणे तसेच ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेत अपात्र लाभार्थ्यांच्या प्रकरणांची सुद्धा तपासणी करावी, अशा सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या.

नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस शेतकऱ्यांना पिक विम्याचा मोठा आधार मिळतो त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांला पिक विमा काढण्यासाठी बँकांनी प्रोत्साहित करावे, अशा सूचना बँकांना देण्यात आल्या.

यावेळी पालकमंत्री सुनिल केदार यांनी जाम येथील बँक ऑफ इंडिया, हिंगणघाट येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखांना भेटी देऊन पिक कर्ज प्रकरणाची चौकशी केली.

समुद्रपूर तलाठी कार्यालयाचे पालकमंत्र्यांचे हस्ते लोकार्पण

समुद्रपूर येथे महसूल मंडळ तलाठी कार्यालय लोकसभागातून 8 लाख रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या तलाठी कार्यालयाचे आज पालकमंत्री सुनिल केदार यांचे हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार समिर कुणावार, माजी आमदार राजु तिमांडे, नगराध्यक्ष गजानन राऊत, हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी, जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, समुद्रपूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपस्थित होते.

यावेळी देशाच्या लोकशाहीची दोन चाके असलेले पदाधिकारी आणि प्रशासन यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांच्या हिताची कामे केल्यास देशातील एकही शेतकरी गरीब म्हणून राहणार नाही, असे सुनिल केदार म्हणाले.

तलाठी कार्यालय बांधण्यासाठी लोकसभाग लाभलेल्या नागरिकांना पालकमंत्र्याचे हस्ते सत्कार करण्यात आला.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.