पुनर्रचनेसह नवीन नेमणुका होणार
मुंबई, दि. ३१ : मराठी भाषा विभागाच्या अधिपत्याखाली खालील येणारे मंडळे/संस्था/समिती यांचे कार्य सुरळीत सुरु असून, या मंडळांची पुनर्रचना आणि नियुक्त्या करण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे, अशी माहिती मराठी भाषा विभागाने दिली आहे. दै.लोकसत्ता या वृत्तपत्रात ‘साहित्य व्यवहाराला कोरोनाची बाधा या सदराखाली प्रकाशित झालेल्या बातमीबाबत खुलासा केला आहे.
मराठी भाषा विभागाने दिलेल्या माहिती नुसार, मुंबई येथील महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, या मंडळामध्ये १ अध्यक्ष व ३० सदस्य असे एकूण ३१ जणांची नियुक्ती दि.५.३.२०१९ च्या शासन निर्णयान्वये तीन वर्षाच्या कालावधीसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत करण्यात आली होती. मंडळाच्या अध्यक्षांनी वैयक्तिक कारणांमुळे दि.२.०१.२०२० रोजी राजीनामा दिल्यामुळे त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. मंडळाची पुनर्रचना करण्याची कार्यवाही चालू आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, या मंडळामध्ये १ अध्यक्ष व ३४ सदस्य असे एकूण ३५ जणांची नियुक्ती दि.२६.१२.२०१८ च्या शासन निर्णयान्वये तीन वर्षाच्या कालावधीसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत करण्यात आली होती, मंडळाच्या अध्यक्षांनी वैयक्तिक कारणांमुळे दि.१९.७.२०२० रोजी राजीनामा दिलेला आहे,राजीनामा स्वीकृतीबाबत कार्यवाही चालू असून, मंडळाची पुनर्रचना करण्याची कार्यवाही चालू आहे.
भाषा सल्लागार समितीमध्ये १अध्यक्ष व ३१ सदस्य अशा ३२ जणांची नियुक्ती शासन निर्णय दि.२६.१२.२०१८अन्वये तीन वर्षाच्या कालावधी साठी करण्यात आली आहे, सल्लागार समिती अद्यापही कार्यरत आहे. पुनर्रचना करण्याची कार्यवाही चालू आहे.
राज्य मराठी विकास संस्था, या संस्थेमध्ये नियामक मंडळावर २१ अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. शा.नि.दि.१७.१०.२०१५ अन्वये अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशासकीय सदस्यांची नव्याने नियुक्ती करण्याची बाब विचाराधीन आहे.