“सच्चा सहकारी गमावला” – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. ३१ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांच्या निधनाने सामान्यांच्या प्रश्नासाठी तळमळीने काम करणारा धडाडीचा कार्यकर्ता, सच्चा सहकारी गमावल्याची भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांनी सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायमच तळमळीने काम केले. त्यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धडाडीचा कार्यकर्ता, सच्चा सहकारी गमावला आहे. संघटनेसाठी धडाडीने काम करणाऱ्या या झुंजार सहकाऱ्याची उणीव कायमच जाणवेल. आकुर्डी गावठाण भागातून त्यांनी महानगरपालिकेचे तीनवेळा प्रतिनिधीत्व केले. सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सभागृहात कायम आवाज उठविला. सामाजिक क्षेत्रातील तसेच महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.