अमरावती: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्राचे ॲड.यशोमती ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

अमरावती, दि. 31 : पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे, पुरामुळे नैसर्गिक आपदेचा प्रसंग ओढवतो. अशा नैसर्गिक आपत्तीत जिवितहानी व वित्तहानी होण्याची दाट शक्यता असते, त्यामुळे अशा नैसर्गिक आपत्तीचे पूर्व नियोजन करुन व्यवस्थापन करणे आता काळाची गरज झाली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

राज्य राखीव पोलीस गट क्र. 9 येथे आज पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल, गटाचे समादेशक लोहीत मत्तानी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन केंद्राची चमू यावेळी उपस्थित होते.

श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, नैसर्गिक, मानवी आणि जैविक असे आपत्तीचे तीन प्रकार असून, या सर्व आपत्तींचे पूर्व नियोजन करणे ही काळाची गरज आहे, कारण अशा आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी होण्याची शक्यता असते. जिल्हास्थरावर स्थापित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या जवानांना अशा आपदा परिस्थिती संदर्भात माहिती देणे, तसेच त्यापद्धतीने जवानांना प्रशिक्षित करुन सजग ठेवणे आवश्यक आहे. आपत्ती व्यवस्थापन केंद्राची हेल्पलाईन चोवीस तास ऑनलाईन ठेवावी. जिल्ह्यात कुठेही नैसर्गिक आपदा उद्भवल्यास तातडीने जिल्हा प्रशासनाने त्याठिकाणी मदत पोहोचवावी. नागरिकांनी सुरक्षित स्थळी तसेच निवाऱ्याची सुविधा, जेवनाचे पाकीट, वैद्यकीय सुविधा आदी बाबी तातडीने त्याठिकाणी पुरविण्यासाठी नियोजन करावे. सुरळीत व पूर्व नियोजन करुन व्यवस्थापन केले तर आपण आपत्तीवर मात करु शकतो, असे त्या म्हणाल्या.

जिल्ह्याच्या सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना, युवक-युवतींना, महिलांना तसेच गावकऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनचे प्रशिक्षण देता यावे, तसेच आवश्यक साधन सामुग्री खरेदी करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यपस्थापन प्राधिकरणला 21 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी यावेळी दिली. या माध्यमातून अतिधोक्याच्या गावात, नदी काळच्या गावातील नागरिकांना आपत्तीच्या समयी कशा पद्धतीने मदत करावयाची याचे प्रात्यक्षिकेतून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आपत्तीच्या वेळी सुरक्षा कशी करावयाची याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.

यावेळी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या जवानांनी अतिशय कठीण अशा अतिशय कठीण प्रात्यक्षिकांचे सादरीकरण पालकमंत्री तसेच उपस्थित अधिकाऱ्यांसमोर प्रस्तुत केले. आज उद्घाटीत झालेल्या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवक-युवतींना पूर व्यवस्थापन कसे करायचे, अपघातात अडकलेल्या लोकांना कसे सोडवायचे, प्रथमोपचार कसे द्यायचे, बोट कशी चालवायची, तराफा कसा चालवायचा आदींचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती श्री.रामेकर यांनी यावेळी दिली.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.