सचिन सावंत यांनी ट्विटरवर केलेल्या आरोपांचे खंडन करताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणतात की, ट्विटमध्ये ज्या पद्धतीने वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे तो अत्यंत खेदजनक, खोडसाळपणाचा आणि दिशाभूल करणारा आहे. हे पूर्णपणे खोटे आणि चुकीचे आरोप आहेत कारण ट्विटमध्ये समाविष्ट कागदपत्रांमध्ये नमूद केलेली भांडवली कामे ही सध्याचे मुख्य निवडणूक अधिकारी हे सीप्झमध्ये (SEEPZ) रुजू होण्यापूर्वीच आधीच्या विकास आयुक्तांनी एनएफसीडीला मंजूर केली होती. कामांच्या सर्व रक्कमा आधीच्याच सक्षम प्राधिकाऱ्यांनी वितरित केल्या आहेत. याबाबतची सर्व माहिती शासनामधील सक्षम प्राधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे.
ट्वीटमध्ये जोडलेल्या दि. ३ जुलै, २०२० च्या पत्राचे काळजीपूर्वक वाचन केल्यास वस्तुस्थिती स्पष्ट होते. उद्योग व वाणिज्य मंत्रालयाच्या दि. ३ जुलै, २०२० च्या पत्रामध्ये एक आयआरएस अधिकाऱ्याचा या प्रकरणातील भूमिकेबाबत स्पष्ट उल्लेख तपासादरम्यान दिसून आल्याचे नमूद आहे. ही बाब स्पष्टपणे सूचित करते की विद्यमान मुख्य निवडणूक अधिकारी यांचे नाव शासनाच्या या पत्रामध्ये नाही आणि विद्यमान मुख्य निवडणूक अधिकारी हे सीप्झमध्ये (SEEPZ) रुजू होण्यापूर्वीच ही सर्व कामे व संबंधित यंत्रणेची (एजन्सी) नियुक्ती झाली होती, असेही स्पष्टीकरण मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिले आहे.