‘कोरोना’ प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  बारामती येथे आढावा बैठक

बारामती, दि. 1 :  बारामती शहरासह तालुक्यात ‘कोरोना’चा प्रसार   रोखण्यासाठी ‘कोरोना’ प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, मुख्य अभियंता महावितरण, सुनील पावडे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील,नगरपरिषद मुख्याधिकारी किरणराज यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, सिल्‌व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, ग्रामीण रूग्णालय रूईचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिल दराडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. तांबे,  गट विकास अधिकारी राहूल काळभोर, जिल्हा परिषद पुणे माजी बांधकाम सभापती संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, नगरसेवक सचिन सातव  आदी  उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाच्या सर्वच रुग्णांना बेड मिळणे आवश्यक आहे. बारामती येथील कोव्हिड सेंटर मध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने कोरोना संसर्गाच्या उपचारासाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदी करावे, त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही.  हॉस्पिटलमध्ये सर्वच कोरोना रुग्णांना बेड मिळणे आवश्यक  आहे. सर्वसामान्य लोकांना या सुविधेचा लाभ मिळणे आवश्यक आहे. तसेच ‘कोरोना’ रुग्णांवर तातडीने उपचार करण्यात यावेत तसेच इतर गंभीर आजारी कोणताही रुग्ण उपचाराशिवाय राहता कामा नये, अशा सूचना ही त्यांनी दिल्या. भविष्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये, यासाठी प्रशासनाने अधिक दक्ष राहून काम करावे तसेच गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 

वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. तांबे यांनी  कोरोना रुग्णांना पुरविण्यात येणा-या सुविधाविषयीची माहिती दिली.

तसेच उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती तालुक्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.