११ हजार ५७० कर्मचाऱ्यांना दिलासा – पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती
मुंबई, दि.1 :- महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कार्यरत तसेच सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रलंबित महागाई भत्त्याची रक्कम देण्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती या प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
श्री.पाटील म्हणाले, प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना तत्कालीन परिस्थितीमुळे दिनांक 1 जुलै 2014 ते 22 मार्च 2017 या (2 वर्षे 8 महिने 22 दिवस) कालावधीतील महागाई भत्त्याची रक्कम शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे अदा करण्यात आलेली नव्हती. प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू करण्यात आलेले आहेत.त्यामुळे प्राधिकरणातील कार्यरत तसेच सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून प्रलंबित महागाई भत्त्याची रक्कम देण्याबाबत वारंवार मागणी करण्यात येत होती. मंत्री श्री. पाटील यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत ही प्रलंबित महागाई भत्त्याची एकूण 61 कोटी 74 लाख रुपये रक्कम अदा करण्यास तत्काळ मंजुरी दिली.
11 हजार 570 अधिकारी व कर्मचाऱ्यांना होणार लाभ
या निर्णयाचा लाभ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सध्या कार्यरत असलेल्या 2 हजार 970 व सेवानिवृत्त झालेल्या 8 हजार 600 अशा एकूण 11 हजार 570 अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.कोरोना विषाणू महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यतत्परतेने प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.